Manoj Jarange : आता न थांबता 2 दिवसांत मुंबई गाठायची; जरांगे पाटलांची मोठी घोषणा
Maratha Reservation News : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक पार पडली.
29 ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांसमोरच मनोज जरांगेंनी हा निर्धार केला आहे. 27 ऑगस्टला निघायचं आणि न थांबता 2 दिवसात मुंबईत जायचं असंही जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘लढंगे जितेंगे हम सब जरांगे’, ‘कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला’ अशा घोषणा देण्यात आल्या. तर मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले की, आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवले जायचे. एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही जमला, तुमच्यासमोर नतमस्तक होतो. जातीसाठी किती ताकतीने लढावे, हे सर्व देशाला तुम्ही दाखवून दिले. मराठा समाजाची दोन वर्षापासून संघर्षाची लढाई चालू असून, आता आता मराठ्यांनी जिंकायचे म्हणजे जिंकायचे, असा निर्धारही जरांगे पाटलांनी यावेळी केला.
