Udayanraje Bhosale : ‘…जेणेकरून भेदभाव होणार नाही’, उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर ‘या’ 5 मागण्या, म्हणाले…
'शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला.', असे म्हणत उदयनराजेंनी पाच मागण्या केल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४५ वी तिथीनुसार पुण्यतिथी असून या निमित्ताने अमित शाह शिवरायांना वंदन करण्यासाठी किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी अमित शाहांसमोर पाच मागण्या मांडल्या. उदयनराजे म्हणाले, ‘शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ मातांबाबत कायदा करा. अजामीनपात्र गुन्हा करा. दहा वर्ष जामीनच मिळू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा. जेणे करून भेदभाव होऊ नये. तेढ होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी. अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड असावे’, असे उदयनराजे म्हणाले. या मागण्यांसह त्यांनी एक मोठी मागणी देखील केली. रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं. कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.
