Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाच्या विर्सजन मिरवणुकीची लगबग, मंडपाबाहेर ढोल-ताशा अन्..
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर आज निरोपाचा क्षण आलाय,
मुंबईची शान अन् नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेले दहा दिवस मोठी गर्दी भक्तांची पाहायला मिळाली. दरम्यान, लालबागच्या राजाचं काल रात्री १२ नंतर चरण स्पर्श दर्शन बंद करण्यात आलं असून आता मंडळांकडून विसर्जनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळातील सदस्यांची एकच लगबग पाहायला मिळतेय. नुकतीच लालबागच्या राजाच्या मूर्तीची उत्तरपूजा संपन्न झाली असून लालबागच्या राजाची शेवटची आरती देखील झाली आहे आणि आता हा जीवाभावाचा लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघाला आहे. ही शान कुणाची लालबागच्या राजाची, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती बाप्पा मोरया या जयघोषात लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय. मंडपाबाहेर पारंपारिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजर असून भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
