‘महाजन संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला आग लावून…,’ काय म्हणाले शिरसाट
नाशिक जागेवरुन लढण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे तर उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला प्रचार करु लागले आहेत.
नाशिकच्या लोकसभा जागेवरुन महायुतील घमासान सुरु आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सिटींग खासदार हेमंत गोडसे यांनी तर उमेदवारी घोषीत केल्याप्रमाणे प्रचार देखील सुरु केला आहे. हेमंत गोडसे यांनी शेकडो समर्थकांसह ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. हेमंत गोडसे यांच्या प्रदर्शनानंतर भाजपा कार्यकर्ते देखील हिरीरीने या मतदार संघावर दावा करीत आहेत. नाशिकचे स्थानिक भाजपाचे पदाधिकारी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या प्रकरणात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की नाशिक मतदार संघाबाबत प्रत्येकाला वाटते आहे की हा मतदार संघ आपल्याला हवा, राष्ट्रवादीला वाटते त्यांना ही जागा मिळावी तर शिवसेनेचा येथे सिटींग खासदार आहे त्यामुळे त्यांनाही ही जागा हवी आहे, तर आमचे तीन आमदार आणि 70 नगरसेवक असल्याने आमचा हा बालेकिल्ला असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की,’गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत. त्यांनी शेपटीला फडके बांधून पुन्हा लंका जाळू नये. हे रामराज्य आहे. युती कशी टीकावी यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
