Ajit Pawar : वीर सावरकरांवरून शेलारांनी सुनावलं, आता अजितदादांचं थेट उत्तर; म्हणाले निवडणूक संपल्यावर…
महायुतीमध्ये वीर सावरकर यांच्यावरून कलगीतुरा रंगलेला आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर आता अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनीही भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar : सध्या राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. काहीही झालं तरी निवडणूक जिंकायचीच असा निश्चय केल्यामुळे सत्ताधारी पक्षदेखील एकमेकांविरोधात सडकून टीका करताना दिसत आहेत. ज्यांनी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आज मी त्यांच्यासोबत सत्तेत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर भाजपाचे अनेक नेते अजितदादांवर टीका करताना दिसत आहेत. हा सर्व कलगीतुरा रंगलेला असताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी युतीत असल्यामुळे अजित पवार यांनादेखील सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. शेलार यांच्या याच विधानावर आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी थेट टीका करणे टाळले
अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना आशिष शेलार यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना अजित पवार यांनी थेट टीका करणे टाळले. तसेच मला फक्त महापालिकेविषयीच प्रश्न विचारा, असेही ते म्हणाले.
अजितदादा नेमकं काय म्हणाले?
“तुम्ही मला विकासाबद्दल विचार. आमच्या महायुतीत अंतर कसे वाढेल, यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. मला फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारावेत. मी ज्या महापालिकेत प्रचारासाठी जाईल, त्याच महापालिकेसंदर्भात मला प्रश्न विचाराला हवेत. इतर प्रश्न विचारले तर मी त्याचे उत्तर देणार नाही,” असे अजित म्हणाले. तसेच निवडणुका संपल्यावर मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल, असे सांगत भविष्यात भाजपाच्या टीकेचा समाचार घेतला जाईल, असा सूचक इशाराही अजित पवार यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट केली. “मला वाटतं की अजितदादांनी सावरकरांच्या विचारांना विरोध केलेला नाही. अजूनतरी मी त्यांना सावरकरांच्या विचारांना विरोध करताना पाहिलेले नाही. परंतु आमची भूमिका ही पक्की आहे. सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? असे विचारले जात आहे.
