नाशिकच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं मोठं ऑपरेशन… दोन माजी महापौरांना फोडले; मोठी खळबळ
Nashik Politics : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दोन माजी महापौर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे ही दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जात सभा घेत आहेत. राज्यातील जास्तीत जास्त महापालिकेत महापौर बसवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नाराज उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात पक्षांतर केले होते. मात्र आता प्रचार सुरु असतानाही पक्षांतराला वेग आला आहे. नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. दोन माजी महापौर एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. हे दोन माजी महापौर कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दोन माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश
ऐन निवडणुकीत नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुर्तडक यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षप्रवेश
मनसेची सत्ता असताना अशोक मुर्तडक हे महापौर होते. मात्र काही काळापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी महापौर होते. त्यांनीही काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
📍 ठाणे |#नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिक येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.#Shivsena #Nashik #EknathShinde… pic.twitter.com/ByGlP7v93o
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2026
प्रेम पाटील शिवसेनेचे उमेदवार
माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटील हे आधापासून शिवसेनेत आहेत. शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिलेली आहे. प्रेम पाटील हे शिवसेनेत असल्यामुळे दशरथ पाटील हेही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता या दोन्ही बड्या नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.
