अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Dec 14, 2025 | 4:09 PM

जयंत पाटील यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर टीका केली. विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. गुंतवणुकीचे करार कागदावरच असून बेरोजगारी वाढत आहे. तसेच, वाढत्या ड्रग्जच्या समस्येवर सरकार ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सात दिवसांच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भाच्या विलिनीकरणाच्या नागपूर करारानुसार सहा आठवड्यांचे अधिवेशन अपेक्षित असताना, केवळ सात दिवसांत एकाही दिवशी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले की, मोठ्या गुंतवणुकीचे दावे पोकळ आहेत. २०.६२ लाख कोटी रुपयांचे १९० सामंजस्य करार झाले असले तरी, प्रत्यक्ष उद्योगांची उभारणी आणि रोजगार निर्मिती झालेली नाही, अनेक प्रकल्प अद्याप जागा वाटपाच्या टप्प्यातच आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आजही अनुत्तरित असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी महाराष्ट्रात वाढलेल्या ड्रग्जच्या समस्येकडेही लक्ष वेधले. सातारा, वर्धा आणि कारंजामधील ड्रग्ज प्रकरणांचा उल्लेख करत तरुणाईला या विळख्यातून वाचवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली. अधिवेशनात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा न होता केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्याचाच हेतू होता, असे पाटील यांनी नमूद केले.

Published on: Dec 14, 2025 04:09 PM