Jitendra Awhad : ते मला मारण्यासाठी आले होते, पण.. ; राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या गेटवरील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या गेटवरील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी सभागृहात भाषण करून थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर आलो, तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मला मारण्यासाठीच आले होते. हा हल्ला कोणी केला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. यापेक्षा मोठा पुरावा कोणता हवा? जर विधान भवनात गुंडांना प्रवेश मिळणार आणि ते हल्ले करणार, तर आमदारांचे जीव तरी सुरक्षित आहेत का? मी स्वतः ट्वीट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ झाली, मारून टाकण्याच्या धमक्या मिळाल्या, कुत्रा-डुक्कर असे शब्द वापरले गेले. हे काय चाललंय विधानसभेत?
आव्हाड पुढे म्हणाले, जर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर आमदारकी कशाला? आमचा काय गुन्हा आहे? कोणीतरी मवालीसारखा येऊन आमच्या कुटुंबियांवर शिव्या देतो. त्या शिवीगाळीला आता ‘अधिकृत भाषा’ म्हणून जाहीर करा. असंसदीय शब्द वापरले जातात, त्यांनाच आता संसदीय म्हणून घोषित करा. सत्तेचा इतका माज? या घटनेने विधान भवनातील आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आव्हाड यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
