Ambadas Danve : सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय, दानवेंचा आरोप; विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने
महाराष्ट्र सरकारवर वीज बील सवलतीच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
विरोधकांनी आज महाराष्ट्र सरकारवर वीज बील सवलतीच्या नावाखाली जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, सध्या राज्यात फसवणूक करणाऱ्यांचे राज्य आहे.
विधिमंडळ परिसरात बोलताना दानवे म्हणाले, शेतकऱ्यांना सातत्याने वीज पुरवठा मिळत नाही, अगदी एक तासही नाही. कमी पावसामुळे विहिरींना पाणी उपसण्यासाठी वीज उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी अडकले आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली, पण ती केवळ 100 युनिटपर्यंत मर्यादित आहे. 101 ते 500 युनिटपर्यंतच्या वीज बिलात प्रचंड दरवाढ करण्यात आली आहे. सरकार एका खिशातून देऊन दुसऱ्या खिशातून काढून घेत आहे. दानवे यांनी पुढे सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठ्याचे आमिष दाखवते, पण प्रत्यक्षात त्यांना काहीच मिळत नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. 100 युनिटपर्यंत वीज वापरणारे फारच कमी लोक आहेत. खऱ्या अर्थाने 300 युनिट्सवर सवलत मिळायला हवी, पण सरकारने 101 युनिटपासूनच मोठी दरवाढ लागू केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
