अर्थखात्यावरुन महायुतीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, सुनेत्रा पवार नाराज? नेमकं वाद काय?
राज्यातील महायुती सरकारमध्ये अर्थखात्यावरून नाराजी वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली.
राज्यातील महायुती सरकारमध्ये अर्थखात्यावरून नाराजी वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्याबाबत आश्वासन मिळूनही अद्याप निर्णय न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पूर्वी अर्थखातं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होतं. त्यांच्या निधनानंतर हे खातं मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलं. अधिवेशनानंतर काही दिवसांत हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय झाला नसल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
