जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर मोठं विधान
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं विधान केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबईत ठाकरे पाहिजेत, अशी जुनी म्हण आहे. कोणत्याही पक्षाचे असले, तरी मुंबईत ठाकरेंनाच पसंती मिळते. पण का, हे मला माहीत नाही. दोन भावांनी एकत्र यावे. वेगळे लढले तरी पडतात, मग एकत्र येऊन पडू दे. लोकांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरांनी एकत्र यावे, तर त्यांनी ते करावे. आम्हाला यात काही फायदा नाही, पण एकदा हे घडून जाऊ दे.
धनगर समाजाच्या पाठिंब्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले, मराठा आणि धनगर समाज वेगळा नाही, तो एकच आहे. आम्ही कधीही वेगळे नव्हतो आणि यापुढेही राहणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा कोणताही विरोध नाही. त्यांच्या या वक्तव्याने मराठा-धनगर एकजुटीवर आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
