अखेर उपोषण सोडलं! आमचं सरकारसोबतचं वैर संपलं.., उपोषण सोडताना जरांगेंचं मोठं विधान
मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण पाचव्या दिवशी संपले. महायुती सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्याबाबत शासकीय आदेश जारी झाला आहे. जरांगे यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले.
मुंबईच्या आझाद मैदानावरील मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण अखेर संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांबाबत शासकीय आदेश (जीआर) जारी झाल्यानंतर जरांगे यांनी लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले.
यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “आमचे सरकारसोबतचे वैर आता संपले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी येथे येऊन माझे उपोषण सोडवावे, अशी आमची इच्छा आहे.” यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांना प्रथम उपोषण सोडण्याची विनंती केली, कारण तिन्ही नेते बाहेर असल्याने त्यांचे येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर, उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली.
