Marathi Issue : महाराष्ट्रात फक्त मराठीच… मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा मोर्चा, नाक्या-नाक्यावरील बॅनर्समध्ये नेमकं म्हटलंय काय?
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाराला मारहाण केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे. मनसेने या मोर्चामागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपसह शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेची दादागिरी सहन करणार नाही असाही इशारा दिला. दरम्यान, मीरा भाईंदरमध्ये उद्या पुन्हा एकदा मोर्चा निघणार आहे.
मीरा भाईंदरमध्ये उद्या पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या मोर्चासंदर्भात नाक्या नाक्यावर मराठी एकीकरण समितीकडून बॅनर झळकवण्यात आले आहेत. सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रेमी यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरातील मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात फक्त मराठीच, राज्य आमचं, भाषाही आमचीच… भाषेला विरोध केला तर संघर्ष हा अटळ अशा आशयाचे बॅनर मीरा भाईंदरमध्ये दिसताय. तर महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा आशयचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
दरम्यान, 29 जून रोजी मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मनसेने जल्लोष केला. त्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते मीरा भाईंदरमधील जोधपूर स्वीट अँड नमकीन या दुकानात गेले. इथं मराठीवरून वाद होऊन व्यापाराला मारहाण झाली. महाराष्ट्रात कोणती भाषा बोली जाते? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला आणि व्यापाऱ्याला मारहाण केली होती.
