कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करणार
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी १७,००० कोटी रुपयांच्या हवामान कृती आराखड्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत २०६० पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि मिठी नदीचे पुनरुज्जीवन केले जाईल. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करून झिरो गार्बेज योजना राबवण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे मुंबईला स्वच्छ व शाश्वत भविष्य मिळेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबईसाठी 2060 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, ज्यासाठी गारगाई, दमणगंगा पिंजाळ आणि इतर जलप्रकल्पांना गती दिली जात आहे.
शहराच्या समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी 16 हजार कोटी रुपयांच्या एसटीपी नेटवर्कचे काम सुरू आहे. येत्या दीड ते दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होतील, ज्यामुळे मुंबईच्या समुद्रात घाण पाणी जाणार नाही. मिठी नदीसह इतर नद्यांचे शुद्धीकरण करण्याचाही विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. कचरा व्यवस्थापनावर भर देत, मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड्सचे कॅपिंग करून बायोमायनिंग केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
कचराभूमीचे पूर्णपणे बंद करून झिरो गार्बेज योजना राबवली जाईल. तसेच, कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करून स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. एकूण 17 हजार कोटी रुपयांचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन मुंबईसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे शहराला सर्क्युलर इकॉनॉमीकडे नेले जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
