Rohini Khadse : …त्याचा मी सत्कार करेन, हगवणेंच्या वकिलाच्या ‘त्या’ युक्तिवादानंतर रोहिणी खडसेंची धक्कादायक ऑफर
खवीसाला कसे सगळेच खवीस मिळत जातात तसे हे हगवणे आणि त्यांची बाजू मांडणारे असल्याचे म्हणत वकिलांवर चित्रा वाघ यांचा निशाणा... आता रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
सुनेचा छळ करणारे आरोपी हागवणे यांच्याकडून कोर्टात अजब असा युक्तिवाद केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी हगवणे यांच्या वकिलाने मृत असलेल्या वैष्णवीच्याच चरित्रावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी अजब असे तर्क मांडलेत. हुंड्यासाठी सुनेचा छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हागवणेंनी आता मृत वैष्णवीवरच दोषारोप केल्याचे काल समोर आले. नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? असा सवाल हगवणेंच्या वकिलांकडून करण्यात आला. यानंतर राजकीय वर्तुळात महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘पोरीला हालहाल करून मारलं तरी अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतां अरे हरामखोरांनो लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची….माणसं नाहीचं तुम्ही…’, असं ट्वीट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी एक धक्कादायक ऑफरच जाहीर केली आहे. वैष्णवी प्रकरणात अजब युक्तिवाद करणाऱ्या त्या वकिलाच्या जो कोणी चार कानाखाली मारेल त्याचा मी जाहीर सत्कार करणार असं खडसे म्हणाल्यात.
