Sanjay Raut : चांदीच्या ताटासोबत सोन्याचा चमचा दिला नाही हे नशीब; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut Press Coference : संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी देण्यात आलेल्या चांदीच्या ताटातील जेवणावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चांदीच्या ताटात जेवण दिल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी आज टीका केली आहे. चांदीच्या ताटासोबत सोन्याचा चमचा दिला नाही हे नशीब, अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे. सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याच्या घास तुला भरविते, असं म्हणत भ्रष्टाचार मुक्त लढाईचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवत आहेत हे चित्र आम्ही काल पाहिला नाही, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. धुळ्याचे विश्राम गृहात जे मोठे रक्कम पकडले, त्या आधी दहा कोटी रुपये जालन्याला गेले हे अंदाज समितीचे अध्यक्ष यांचे कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे त्यांना चैनबाजीची चटक लागलेली आहे. खरं म्हणजे अंदाज समितीच्या बैठकीला बसायला त्यांना दिलं नाही पाहिजे होतं. त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. पण नशीब त्या सदस्यांना सोन्याचा चमचा दिला नाही, असंही टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.
