Sanjay Raut : आमच्या भावना आणि संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut On Pahalgam Attack : उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना उबाठा पक्ष हा या संकटाच्या काळात सरकारसोबत असल्याचं म्हंटलं आहे.
एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आणि संवेदना या सरकार सोबत आहे. देशावरील असलेल्या या संकटाच्या काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रिया उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो सरकारच घेत असते. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचंही राऊत यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, काश्मीर आणि मणिपूर हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्हाला बोलू दिले पाहिजे. संविधानावरील अधिवेशनातील चर्चे दरम्यान काश्मीरवर बोलण्यास फार कमी वेळ मिळाला. हिंदू – मुसलमान राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल देशवासीयांचे आभार मानायला हवे. मात्र या सर्व विषयावर संसदेमध्ये चर्चा झाली तर त्यामुळे सरकारला चांगली दिशा मिळेल. सर्व पक्षीय बैठकीत देखील हाच सूर असतो. मात्र, या काळात विरोधी पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन देखील सरकारने करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
