Sharad Pawar : शरद पवार यांचा शिक्षक आंदोलनाला पाठिंबा, महायुती सरकारवर टीका
मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.
मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर आज खुद्द शरद पवार यांनीही शिक्षकांना भेट देत त्यांचे मनोबल वाढवले. शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत पवार यांनी शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत काम केले आहे. निधीची तरतूद कशी करायची, हे मला चांगले माहीत आहे. 5 जूनपासून आझाद मैदानात शिक्षक समन्वय संघाच्यावतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे.
पवार पुढे म्हणाले, शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून चिखलात बसावे लागणे योग्य नाही. निधीची तरतूद न करणारा आदेश म्हणजे कचऱ्यात टाकण्यासारखा आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांवर अशी परिस्थिती येऊ देऊ नये. त्यांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची ग्वाही दिली आणि सरकारला एका दिवसात शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
