वाल्मिक कराड टोळीचा शोध… पोलीस पथकात कराडचाच दोस्त मग बीड पोलीस काय करत होते?
बालाजी तांदळेला सह आरोपी करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली मात्र तांदळेने समोर येऊन जी माहिती दिली ती सुद्धा धक्कादायक आहे. कराड समर्थक असलेल्या बालाजी तांदळेला घेऊन बीडचे पोलीस अनेक दिवस कराड आणि त्याच्या टोळीचा शोध घेत होते. हे स्वतः तांदळेनेच सांगितलेले आहे.
पोलिसांकडून संतोष देशमुख हत्तेचा तपास नेमका कसा होतोय हे ऐकल्यावर तुमचही डोक काही काळासाठी काम करण बंद करेल. फक्त उदाहरण म्हणून दोन घटना बघा. वाल्मिक कराड आणि इतर आरोपी फरार असताना बीडचे पोलीस हे कराडच्याच कट्टर समर्थक असलेल्या बालाजी तांदळेच्याच स्कॉर्पिओ गाडीने आरोपींचा शोध घेत होते. म्हणजे कराड आणि टोळीला पकडणाऱ्या गाडीत कराडचाच मित्र असायचा. नंतर कराड दैवत असं मानणारा दुसरा समर्थक मोराळेच्याच स्कार्पिओ गाडीतून कराड पोलीसांपुढे सरेंडर झाला. यावर मोराळे म्हणतो की कराड अचानक दिसले त्यांनी लिफ्ट मागितली आणि त्यांना सरेंडर होण्यासाठी माझ्या गाडीतून सोडून आलो. म्हणजे कराड टोळीचे शोधावेळी बीड पोलीस कराड समर्थकाला सोबत घेऊन कराड टोळीला शोधतात आणि दुसरीकडे कराड आपल्याच समर्थकाच्या गाडीने बादशाही थाटाट सरेंडर होतो. आता कराड टोळीच्या शोधासाठी बीड पोलीस कराड समर्थकाला त्याचीच गाडी घेऊन का फिरवत होते यावर हा प्रश्न बीड पोलिसांनाच विचारा असं बालाजी तांदळे म्हणतोय.
केज शहराच्या पुढे काही अंतरावर तांदळेच गाव कोरेगाव. काही अंतरावर हे संतोष देशमुख यांच मस्साजोग गाव. मसाजोग मार्गे एक रस्ता धारशिवच्या वाशीकडे जातो. दुसरीकडे केज शहराच्या पुढूनही एक रस्ता चिंचोली मार्गे धारशिवला पोहोचतो. ९ डिसेंबरला हत्या करून सर्व आरोपी स्कार्पिओने वाशीकडे जात होते. तांदळे म्हणतो की हत्तेच्या दिवशी मसाजोगमध्ये रस्ता रोको होता म्हणून पोलिसांनी माझी स्कॉर्पिओ घेऊन मला केजला बोलावलं आणि पुढे पोलीसच माझ्या गाडीत बसून माझ्यासोबत आरोपींच्या शोधासाठी वाशीकडे रवाना झाले. म्हणजे मारेकरी हत्येनंतर स्कार्पिओ गाडीने पसार झाले आणि पोलीस त्याच मारेकऱ्यासोबत सीसीटीव्हीत दिसलेल्या बालाजी तांदळेचीच गाडी घेऊन आरोपींना शोधत होते.
