क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, व्हिडीओ कॉलवर बोलत ड्रायव्हिंग… बेदरकार रिक्षाचालकाचा तो व्हिडीओ समोर

| Edited By: | Updated on: Dec 29, 2025 | 9:46 AM

डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले आणि व्हिडिओ कॉलवर बोलत रिक्षा चालवली. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या निष्काळजीपणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरटीओ आणि पोलिसांकडून कारवाई न झाल्याने नागरिक संतप्त असून, कठोर उपाययोजनांची मागणी करत आहेत.

डोंबिवलीच्या मानपाडा रो़ड परिसरात वाहतुकीच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचं चित्र दिसत आहे. रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून, आणि त्यावर कळस म्हणजे तोच रिक्षाचालक मोबाईल व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांवर आरटीओ आणि ट्राफिक पोलिसांची कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नाहीये.

प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ

डोंबिवली मानपाडा भागात एका रिक्षा चालकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेशी अक्षरशः खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नियमांनुसार रिक्षात तीन प्रवासी बसवणे अपेक्षित असताना, सदर चालकाने तीन प्रवासी मागील सीटवर तर एक प्रवासी थेट चालकाच्या बाजूला बसवून प्रवास केला. एवढंच नवहे तर धक्कादायक बाबा पुढे आहे. तो रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्याचा मोबाईल फोन स्टिअरिंगच्या समोर ठेवत थेट व्हिडिओ कॉलवर बोलत रिक्षा चालवली. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांपैकीच कुणीतरी मोबाईलमध्ये टिपला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मोबाईलमध्ये गुंतलेलं लक्ष आणि ओव्हरलोड झालेली प्रवासी यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड भीतीत होते, मात्र याच रिक्षात बसून ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

ट्राफिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई नाही

सर्वात गंभीर बाब म्हणजे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जबाबदार असलेल्या आरटीओ आणि ट्राफिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. डोंबिवलीत अनेक रिक्षा चालक खुलेआम वाहतूक नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. जर वेळीच कडक कारवाई झाली नाही, तर भविष्यात याच निष्काळजीपणातून एखादा मोठा आणि जीवघेणा अपघात घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Published on: Dec 29, 2025 09:37 AM