“पप्पा..बाप्पा पाण्यात बुडतोय याला बाहेर काढ ना..” , गणपती विसर्जनादरम्यान निरागस चिमुरडीची विनवणी, video व्हायरल

| Updated on: Sep 03, 2025 | 11:38 AM

कोल्हापुरातील फुलेवाडी येथे गणेश विसर्जनादरम्यान एका चिमुरडीने तिच्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अश्रू ढाळल्याची भावूक घटना घडली. गणरायाची मूर्ती पाण्यात बुडताच मुलीचा हंबरडा फुटला. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गणेशोत्सवाच्या भावनिक बाजूचे दर्शन घडवतो.

महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव सुरू असल्याने सध्या राज्यभरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. बाप्पा आल्यापासूनच भक्त त्याच्या पूजेत, आरतीत मग्न असून काल अनेक ठिकाणी गौरी-गणपतीचं विसर्जन झालं. घरोघरी सोनपावलांनी आलेल्या गौराईंचं जेवण, पूजा यथासांग पार पडले आणि घरगुती गणपतींसह त्या आपल्या घरी परत गेल्या. भक्तांनी वाजत गाजत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लौकर याच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला आणि गौराईला निरोप दिला.

मात्र त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. गणेश चतुर्थीला आलेल्या बाप्पासाठी खास तयारी, मखर, सजावट करण्यात आली होती. मोदक, लाडू, मिठाईचा नैवेद्य दाखवून, सकाळ संध्याकाळ झांजेच्या गजरात बाप्पाची आरती करत हे सात दिवस कसे गेले ते अनेकांना कळलंच नाही. पण काल बाप्पाची घरी परतण्याची, विसर्जनची वेळ जवळ येताच अनेकांच्या डोळ्यां पाणी आलं.

चिमुरडीला अश्रू अनावर

मोठे तर मोठे पण लहान मुलंही बाप्पाला निरोप देताना इमोशनल झाली होती. अशीच एक मन हेलावणारी घटना कोल्हापूरमध्येही घडली आहे. कोल्हापुरातही अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मात्र याचदरम्यान कोल्हापूरच्या फुलेवाडी मध्ये एक भावनिक क्षण बघायला मिळाला. तिथे एक चिमुरडी मुलगी तिच्या वडिलांसह आणि कुटुंबियांसह गणपती विसर्जनासाठी आली होती खरी, पण तिला बाप्पाला सोडवतंच नव्हतं. गणरायाची आरती करून त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आल्यावर त्या चिमुकलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं.

बाबांनी , आजोबांनी तिची कशीबशी समजूत काढत बाप्पाला विसर्जनसाठी हौदाजवळ नेलं खरं, पण गणरायाची मूर्ती पाण्यात बुडवताच त्या मुलीने एकच हंबरडा फोडला. गणराय पाण्यात जाताच ती हमसून रडायला लागली. काय झालं तुला असं विचारल्यावर तिला धड बोलताही येईना तिच्या डोळ्यातील अश्रूंना खळच नव्हता.. “पप्पा..बाप्पा पाण्यात बुडतोय याला बाहेर काढ ना..” अशी निरागस विनवणी ती तिच्या वडिलांकडे करत होती. तिच्या वडिलांनी जवळ घेत तिची कशीबशी समजूत काढली, पण गणरायाचे विसर्जन करावेच लागते, तो पुढल्या वर्षी येईलचना, हे समजवताना तो बापही भावूक झाल्याचे दिसून आले. या लहान मुलीचां हा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय.

 

Published on: Sep 03, 2025 11:38 AM