Maharashtra News LIVE : एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांची घेणार भेट
Maharashtra News LIVE Updates : गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी मुंबईसह उपनगरीय मार्गावरील प्रमुख स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
हिसार ते तिरुपती रेल्वे आता रोज धावणार
नागपूरसह मध्य भारतातून तिरुपती बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आता रेल्वेची नियमित सेवा. हिसार ते तिरुपती रेल्वे आता रोज धावणार. हिसार ते तिरुपती रेल्वे नियमित केल्याने या निर्णयामुळे विदर्भातून तिरुपती जाणाऱ्या भाविकांना नियमित रेल्वे उपलब्ध असणार आहे
-
नागपूर महानगर पालिकेच्या महापौर, उप महापौर पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखाचा खर्च
कोणत्याही प्रकाराची निविदा न काढता हा खर्च करण्यात आला.. आता स्थायी समितीची कार्योतर मंजुरी घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप. कार्यक्रमासाठी स्टेज उभारणी, मंडप, पाणी, चहा, भोजन व्यवस्था यावर मोठ्या प्रमाणात खर्च.. फुल सजावटीसाठी अडीच लाख, माणसासाठी 2 लाख 57 हजार , रेड कार्पेटसाठी 51 हजार, एलइडी वॉलसाठी 32 हजार तर 1500 लोकांच्या भोजनासाठी 4 लाख 44 हजार खर्च दाखविण्यात आला आहे..
-
-
अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची मागणी
अनधिकृत शाळांची नेमकी माहिती नसल्याने दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होते. यंदा बहुतेक खासगी शाळची पूर्व प्राथमिक वर्गाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. झाली तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही मुंबई महानगरमधील अनधिकृत शाळांची यादी शैक्षणिक वर्ष सुरु होनापूर्वी आहीर करण्यात यावी, अशी मागणी पालक संघटनांकडून करण्यात येत आहे
-
ठाणे महापालिकेतील रखडलेल्या 1773 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
ठाणे महापालिकेतील रखडलेल्या 1773 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या महिन्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सार्वत्रिक निवडणूक लागल्याने या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. तांत्रिक कारणामुळे तब्बल सहा महिन्यापासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिकेतील 1773 पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेतील क आणि ड वर्गातील 1773 पदांसाठी ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात काढण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे.
-
दिल्लीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार
दिल्लीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्ह याबाबत सुरू असलेल्या खटल्याचाही आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची शिंदेंनी बैठक घेत पक्षाची नेमकी भूमिका काय असणार याबाबत मार्गदर्शन केलं. मात्र मुंबईतील आर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून शिंदे तातडीने दिल्लीला गेल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
यात प्रामुख्याने मागील ३ निवडणुकांमध्ये मित्र पक्षाकडून विविध ठिकाणी न मिळालेले सहकार्य, त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले याचा अहवालही पक्षांतर्गत बनवण्यात आल्याची माहिती आहे. हा अहवाल शिंदेंकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला जाऊ शकतो अशी पक्षांतर्गत चर्चा आहे.
-
-
जालना- गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला
जालन्यातील उटवद शिवारातील एका गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून तब्बल 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहे. उटवद शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर आणि दोन पाच किलोचे व्यावसायिक गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत.या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांचे आव्हान
मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील ३८ लाख प्रकरणांमधून २२७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढली आहे.
-
-
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या
उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कोकण रेल्वेने मध्य रेल्वेशी समन्वय साधून मुंबई ते गोवा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १६ एप्रिल ते ११ जून या कालावधीत, दर गुरुवारी रात्री १२.२० वाजता चालवली जाईल. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मडगाव ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिल ते १२ जून या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. रात्री १२.५५ वाजता ही गाडी एलटीटीहून सुटेल.
-
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस पुरीचा बेत महाग, हापूस आंब्याचे दर गगनाला
गुढीपाडवा सण जवळ येत असताना वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. परंतु कोकणातील हापूस मर्यादित प्रमाणात येत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. परिणामी, यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमरस-पुरीचा बेत महागात पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सोमवारी बाजारात एकूण १६,८४५ आंब्याच्या दाखल झाल्या. त्यात कोकणातील पेट्या ६,३२५ पेट्या, तर इतर राज्यांतील १०,५२० पेट्यांची नोंद झाली.
-
शिल्पा शेट्टीची डीपफेक छायाचित्रे हटविण्याचे आदेश
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांना लक्ष्य करून तयार करण्यात आलेली एआय-निर्मित डीपफेक छायाचित्रे आणि चित्रफिती तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जवळपास २८ संकेतस्थळांना दिले आहेत. त्यासाठी या संकेतस्थळांना आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. या प्रकारामुळे शिल्पा हिच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाले आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने नोंदवले.
-
साखर निर्यातीसाठी अतिरिक्त कोटा मंजूर
केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २०२५-२६ मध्ये (ऑक्टोबर ते सप्टेंबर) साखर निर्यातीसाठी अतिरिक्त ८७,५८७टनांचा कोटा मंजूर केला आहे. साखर कारखान्यांकडून आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला, असे मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. यापूर्वी सरकारने या हंगामासाठी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये इच्छुक साखर कारखान्यांना अदलाबदल न करता येणाऱ्या स्वरूपात अतिरिक्त पाच लाख टनांचा कोटा देण्यात आला होता. त्यासाठी फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती.
-
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली. भाज्यांच्या किमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत घाऊक महागाई दर फेब्रुवारीत २.१३ टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो १.८१ टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये २.४५ टक्के पातळीवर होता.
सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाईचा भडका उडाला असून, ती 11 महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. भाज्यांच्या किंमतीत जरी या महिन्यांत घसरण झाली असली तरी खाद्य आणि बिगरखाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आल्याचं सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी मासिक आकडेवारीने स्पष्ट केलं. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाई दर फेब्रुवारीत 2.13 टक्के नोंदविण्यात आला. या निर्देशांकात झालेली ही सलग चौथ्या महिन्यातील वाढ आहे. या आधी जानेवारीत तो 1.81 टक्के तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 2.45 टक्के पातळीवर होता. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवाशांची संख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Mar 17,2026 8:06 AM
