Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत वांद्रे पूर्वेतील संरक्षण विभागाच्या जमिनीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत वांद्रे पूर्वेतील संरक्षण विभागाच्या जमिनीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या मालकीची ही जमीन असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडला आहे. कधी संरक्षण खात्याचा विरोध, तर कधी रेल्वेचा अडथळा येतो. ही परिस्थिती आम्हालाही माहित आहे. काही आमदारांनी सांगितले की, गेल्या चार टर्मपासून हा प्रश्न जैसे थे आहे. 2017 पासून कोणीच याकडे लक्ष दिलेले नाही. मंत्र्यांकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. विधान भवन हे केवळ मजा-मस्तीसाठी आहे का?
पुढे बोलताना ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला, एकीकडे ‘चड्डी बनियान गँग’ धक्काबुक्की करते, पण जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार नाही. हा सगळा काय गोंधळ आहे? सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर दिसणारी मस्ती कशासाठी आहे? आम्ही आमदार आहोत, आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत. सत्ताधारी पक्षाचे आमदारही प्रश्न विचारतात, पण त्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे तयार नाहीत.
