Beed : महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने पूर्ण; पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्…
बीडच्या परळीत झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने पूर्ण मात्र एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही. याप्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
बीडच्या परळी शहरात महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली होती. अद्यापपर्यंत या प्रकरणात एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबीयांनी आज यासंदर्भात बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. तात्काळ आरोपींना अटक न झाल्यास पुढील आठ दिवसात आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबाने दिलाय. तर tv9 शी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिक कराडनेच बंगल्यावरून फोन करून तपास थांबवल्याचा थेट आरोप केला आहे.
प्रथमच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बंगल्यावरून पोलीसांना कुणाचा फोन गेला याबाबतचा खुलासा केला आहे. यामध्ये राजकीय दबाव येतोय का? असा संशय येत असल्याचंही मुंडे म्हणाल्या. तर पोलिसांना भेटून आज न्याय मिळेल असं वाटलं नाही शेवटी आमचं आत्मदहनच होईल असंही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणात वाल्मीक कराडचे काही वर्ष सहकारी राहिलेल्या विजयसिंह बांगर यांचाही जबाब नोंदवण्यात आला तरीही तपास शून्यच आहे.
