Uday Samant : उदय सामंत अन् संदीपान भुमरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
शासनाने जे गुन्हे मागे घेतो म्हणून सांगितलेलं आहे, त्यामध्ये वेगाने कारवाई होत नाही, या संदर्भात काम सुरू झालेलं दिसत, अशी भावना मनोज जरांगे पाटील यांनी उदय सामंत यांच्याकडे व्यक्त केली. यानंतर याच संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सामंत म्हणाले.
शिवसेना नेते, राज्याचे मंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील शहागड येथील मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यालयात उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर उदय सामंत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट कोणतीही गोपनीय अशी भेट नव्हती. कॅमेऱ्यासमोर सगळ्या गप्पा झाल्या आहेत, असे म्हणत असताना जरांगे पाटील आणि आमचे संबंध आहेत, म्हणून त्यांना भेटायला आलो आहे. आज जरांगे पाटील यांनी सामाजिक स्तरावरचे मुद्दे सांगितले आणि ते मुद्दे घेऊन आम्ही 23 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. पुढे त्यांनी असेही सांगितले की, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात किंवा शिंदे समितीला वेळ वाढवून देण्याची समितीला कामाला लावणे या संदर्भात आम्ही 23 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे.
