Vijay Wadettiwar : हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांनी दावा केला की, महाविकास आघाडी सरकार उलथवून सत्तेत आलेले शिंदे सरकार एका नाशिकमधील ‘सीडी’ प्रकरणामुळे आणि हनीट्रॅपमुळे सत्तेत आले. यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या हनीट्रॅपच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ना हनी आहे, ना ट्रॅप. नाना पटोलेंचे बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, असे म्हणत खोडून काढले होते.
वडेट्टीवार यांनी या पार्श्वभूमीवर स्फोटक दावा केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री काल म्हणाले की, ना हनी आहे, ना ट्रॅप. पण सरकार आणि विरोधकांकडे यासंदर्भात मोठी माहिती आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणे योग्य नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. पण शिंदे सरकार यापूर्वी नाशिकच्या एका प्रकरणामुळे सत्तेत आले. सत्तापालटाचे कारण एक सीडीच होती. या प्रकरणात अनेक आयएएस, माजी अधिकारी आणि मोठी माणसे सामील आहेत. यावर जास्त बोलण्याची गरज नाही. पुढे ते म्हणाले, आम्ही पुरावे दाखवायचे ठरवले, तर आम्हाला 10-20 हजारांचे तिकीट लावावे लागेल आणि ते चित्र फक्त निवडक लोकांनाच दाखवावे लागेल. एवढा भक्कम पुरावा आमच्याकडे आहे. वडेट्टीवार यांच्या या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा आणि खळबळ माजली आहे.
