Maharashtra Breaking News LIVE 20 May 2025 : पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे पुणे विमानतळावर गळती
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या तीन शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आज मार्गदर्शन करणार आहेत. खासदार संजय झा, खासदार कनिमोझी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना माहिती देणार आहेत. दहशतवादाचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारत जगातील अनेक देशांमध्ये खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवत आहे. 7 शिष्टमंडळे जगातील 32 देशांना भेट देतील आणि पाकिस्तान दहशतवादाला कसं प्रोत्साहन देत आहे हे स्पष्ट करतील. कुठल्या देशांसमोर काय आणि कशी बाजू मांडावी याबाबत परराष्ट्र सचिव आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा होणार आहे. आज दुपारी संसदेत माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर हे शिष्टमंडळ उद्या परदेश दौऱ्यावर निघतील. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकार कडून SIT स्थापित करण्यात आली आहे. मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानावर कोर्टाने SIT गठीत करण्याचे निर्देश दिले होते. या एसआयटीमध्ये IG प्रमोद शर्मा, DIG कल्याण चक्रवर्ती आणि SP वाहिनी सिंह यांचा समावेश आहे. SIT आपला रिपोर्ट चौकशी करून सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाने काल तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री विजय शाह यांचा माफीनामा स्वीकारला नव्हता. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
LIVE NEWS & UPDATES
-
वर्धा जिल्ह्याला पावसानं झोडपलं, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस
वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला
अचानक आलेल्या पावसामुळे उडाली तारांबळ
वर्धा शहरासह विविध भागांमध्ये बरसल्या पावसाच्या सरी
अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ
-
पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे पुणे विमानतळावर गळती
पुण्यात अचानक आलेल्या पावसामुळे पुणे विमानतळावर गळती झालेली पाहायला मिळाली आहे. नवीन टर्मिनलवर देखील पावसामुळे गळती झाली आहे. तर दुसरीकडे विमानतळावरच ड्रेनेज मधले पाणी देखील रस्त्यावर आले आहे. पुण्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे विमानतळावर काल देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
-
-
सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये धुवाँधार
सांगली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दुपारपासून जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये धुवाँधार पाऊस पडतोय.सांगली, मिरज आणि आसपासच्या शहरात दीड तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे.तर शिराळा, इस्लामपूर यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. या पावसामुळे भाजीपाला शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
जालन्यातील बदनापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर; तुपेवाडी गावात मंडप कोसळला
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील राजूर परिसरात असणाऱ्या तुपेवाडी गावात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तुपेवाडी या गावात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचा मंडप कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
सणसवाडीनंतर पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळलं
पुण्यातून मोठी बातमी समोर आलीय. पुण्यात आणखी एक होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील मंतरवाडी येथे होर्डिंग कोसळल्याचं समोर आलं आहे. काही वेळापूर्वी पुण्यातील सणसवाडी मध्ये होर्डिंग कोसळल्याची घडली होती घटना, त्यानंतर आता फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळलं आहे.
-
-
कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघांचा मृत्यू
कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणमधील मधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याने चौघांचा मृत्यू झला आहे. ढिगार्याखाली अडकलेल्या चौघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 3 महिलांसह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्याकडून गेल्या दोन तीन तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यंत्रणांनी रेस्क्यू करुन एकूण 8 जणांना बाहेर काढले. त्यापैकी चौघांचा दुर्देवी अंत झाला. तर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
श्री अमरनाथ श्राइन बोर्डाची पुनर्रचना
अमरनाथ यात्रेची व्यवस्था आता एका नवीन पथकाकडे सोपवण्यात आली आहे. एलजी मनोज सिन्हा यांनी श्री अमरनाथ श्राइन बोर्डाची पुनर्रचना केली आहे. एलजीने संस्थेची पुनर्रचना केली आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी 9 प्रतिष्ठित व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती केली. यामध्ये प्रशासकीय, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.
-
सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज: आयएमडी
बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे आणि आर्द्रता शिरल्यामुळे सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की पूर, भूस्खलन आणि प्रवासात व्यत्यय येण्याचा धोका आहे.
-
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यावेळी 257 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सर्वाधिक प्रकरणे केरळ आणि महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये 69, महाराष्ट्रात 44 आणि तामिळनाडूमध्ये 34 प्रकरणे नोंदली गेली आहेत. याशिवाय कर्नाटकात 8, गुजरातमध्ये 6 आणि दिल्लीत 3 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
-
कर्नाटकात आम्ही 5 हमी दिल्या होत्या, पण आज आम्ही सहा पूर्ण केल्या आहेत: राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटकातील निवडणुकीदरम्यान आम्ही पाच हमी दिल्या होत्या, पण आज आम्ही सहा पूर्ण केल्या आहेत. एक लाखाहून अधिक कुटुंबांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क देण्यात आले आहेत. कर्नाटकच्या भविष्यासाठी ही सर्वात महत्त्वाची हमी आहे, ज्याचा थेट फायदा कोट्यवधी कुटुंबांना, विशेषतः गरीब, दलित आणि आदिवासींना होईल.
-
पुण्यात गोळीबार प्रकरणात अपडेट समोर
निलेश घारे यांच्या गाडीवरती अज्ञात दोन इसमांनी गोळीबार केला होता. पोलीस या घटनेचा तपास करीत असून दोन संशयतांची नावे पुढे आली आहेत असे पोलीसांनी म्हटले आहे..
-
दिल्लीतील शनिभक्ताकडून शनि शिंगणापूरमधील शनिदेवाला 80 लाखांचा सोलार प्रकल्प दान
दिल्लीतील शनिभक्ताकडून शनि शिंगणापूरमधील शनिदेवाला 80 लाखांचा 250 किलो वॅटचा प्रकल्प म्हणजे सोलार प्रकल्प दान करण्यात आला आहे. सोलार प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पाने शनि मंदिराचा वर्षाचा 7 ते 8 लाख रुपये खर्च वाचणार आहे.
-
छगन भुजबळांना मंत्री पद देऊन अजित पवार चुक करतायत: मनोज जरांगे पाटील
छगन भुजबळ यांनी आज (मंगळवारी) सकाळी राजभवन येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, भुजबळ यांचे कट्टर विरोधक आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या या शपथविधीवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहेत. ते म्हणालेत की, “अजित पवार जातियवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. भुजबळांना मंत्री पद देऊन अजित पवार मोठी चूक करतायत” अशा शब्दात जरांगे यांनी टीका केली आहे.
-
नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रीमंडळाची मंजुरी
नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रीमंडळाची मंजुरी, राज्यातील गृहनिर्माण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. 5 वर्षांत 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन. राज्य सरकारचे 70 हजार कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण आहे. EWS, LIG आणि MIG घटकांना घरं देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवणार.
-
धुळ्यातील कचरा संकलनाच्या 16 गाड्या बंद
धुळ्यातील कचरा संकलनाच्या 16 गाड्या बंद असून कचरा संकलन होत नसल्याने शहरातील विविध चौकात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
मे पासून महापालिकेच्या वतीने कचरा संकलन केलं जात आहे, मात्र 79 गाड्यांपैकी 16 गाड्या बंद आहे.
-
ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ परतूर शहरात तिरंगा रॅली, भाजप आमदार बबनराव लोणीक उपस्थित
ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ परतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत.
-
उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या ६ फूट खोल खड्ड्यात पडून बाईकस्वार जखमी
उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी झालाय. आशेळे माणेरे रोडवर सोमवारी रात्री हा अपघात झाला. आशेळे माणेरे रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणसाठी खोदकाम सुरू असून सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास एक बाईकस्वार आशेळेकडे जात असताना नागराणी महावितरण कार्यालयासमोर खोदलेल्या 6 फूट खोल खड्ड्यात कोसळला. तो जबर जखमी झाला.
-
धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पुन्हा एकदा दिसतील
लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे, अंजली दमानियांवर टीका केली. अंजली दमानिया या काय सुप्रीम कोर्टाच्या जज आहेत का? आरोप करणे हा त्यांचा व्यवसाय, उद्योग आहे. त्यावर त्यांचे पोट चालते, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. तर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पुन्हा एकदा दिसतील असा दावा त्यांनी केला.
-
पाकने स्वतःच्या नागरिकांवर केला ड्रोन हल्ला
पाकिस्तान लष्कराने पश्चिम वझारिस्तानमध्ये स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप खासदारांनी संसदेत केला. तर मंत्री ख्वाजा आसिफ याने मीडियाच्या प्रश्नाला उत्तर न देताच पळ काढला.
-
बिटिंग रिट्रीट सेरेमनी होणार
भारत-पाकिस्तान सीमेवर दररोज बिटींग रिट्रीट सेरेमनी होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही बिटिंग रिट्रीट सेरेमनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी जाऊ शकतील.
-
कारने घेतला पेट
नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर कारने पेट घेतला. वेळीच गोष्ट कार चालकाच्या लक्षात आला. त्यामुळे त्याने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. पुढील मोठा अनर्थ टळला. चालक यामध्ये किरकोळ जखमी झाला.
-
कळवा ते मुंब्रा दरम्यान लोकलची जलद वाहतूक खोळंबली
सीएसएमटीकडून कल्याण कडे जाणारी कळवा ते मुंब्रा दरम्यान लोकलची जलद वाहतूक खोळंबली. सीएसएमटीकडून कल्याण कडे जाणारी वातानुकूलित लोकला एका जनावराची धडक लागून अपघात झाला असून सदर जनावर लोकल खाली अडकले होते. जनावराला बाहेर काढण्यात आले असून कल्याण जलद मार्गावर वाहतूक मंदावली आहे.
-
धनंजय मुंडे यांचे दालन भुजबळांना
मंत्रालयातील एनेक्स इमारतीत २०२ नंबरचे दालन छगन भूजबळ यांना मिळणार आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे हे दालन होते. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
-
ओंकार मोरे याला अटक
शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्या प्रकरणी फरार असलेल्या ओंकार मोरे याला रात्री पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली आहे.
-
शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या कारवर फायरींग
पुणे येथील शिवसेनेचे शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे आपले काम उरकून घराकडे निघाले होते. त्यानंतर ते गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले. गाडी पार्क करत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गाडीवर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी वारजे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन आरोपींना बेड्या
तुळजापूर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात आणखी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. आबासाहेब गणराज पवार आणि नानासाहेब अण्णासाहेब खुराडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 18 वर पोहचली. ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील आरोपींसह एकूण 36 आरोपींचा सहभाग आहे. या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
-
छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने धाराशिवमध्ये जल्लोष
छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळाल्याबद्दल धाराशिव शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.
-
सिंहगड किल्ल्यावर १ जूनपासून प्लास्टिक बंदी
गड-किल्ले संवर्धनासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. हा नियम १ जून पासून लागू करण्यात आला आहे. हा नियम मोडणाऱ्या पर्यटकांना अनामत रक्कम द्यावी लागणार.
-
शहरातील लेडीज क्लब चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा उभारण्यात आला पुतळा
धाराशिव शहरातील लेडीजक्लब चौकात शंभू प्रेमींकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला. त्या पुतळ्याला कायदेशीर मान्यता देऊन तो कायम करावा ही मागणी जोर धरत आहे. धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची गरज आहे. तशी धाराशिव करांचीइच्छा होती. उस्फुर्तपणे उभारण्यात आलेला पुतळा कायम करावा , त्याला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी शंभु प्रेमीकडून करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने केली.
-
ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने धाराशिवमध्ये जल्लोष
छगन भुजबळ यांना मंत्री पद मिळाल्याबद्दल धाराशिव शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आनंद साजरा करण्यात आला. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला…
-
जागेच्या वादातून महिला प्रवाशाला मारहाण
जागेच्या वादातून महिला प्रवाशाला मारहाण… CSMT अंबरनाथ लोकलमधील घटना… महाराणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
-
खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला होता.
-
तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी दर्शन कोटा बंद
श्री तुळजाभवानी मंदिरात व्हिआयपी दर्शनासाठी मंदिर संस्थानच्या वतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी मोफत दर्शन कोटा बंद करण्याचा निर्णय मंदिर संस्थानकडून घेण्यात आला आहे. १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची रोख देणगी किंवा भेटवस्तू देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबियांना निःशुल्क दर्शन मिळणार आहे.
-
विक्रोळी पुलावर दोन वाहनांचा अपघात
मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो आणि टाटा सफारी या दोन वाहनांचा अपघात झाला. विक्रोळीमधील नारायण बोधे ब्रीजजवळ हा अपघात झाला. टेम्पोने धडक दिल्याने टाटा सफारी ही दुसऱ्या मार्गाकडे जाऊन पलटी झाली. अपघातात दोन्ही गाड्यांमधील चालक जखमी झाले आहे.
-
कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची १ कोटी ३५ लाखांत फसवणूक
जळगावच्या दोन कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची १ कोटी ३५ लाखांत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. कापसाच्या गाठी खरेदी केल्या. मात्र, त्यामोबदल्यात रक्कम न देताच आरोपींनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
-
ठाणे जिल्हा परिषदेतील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
ठाणे जिल्हा परिषदेतील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे समुपदेश करून वर्ग तीन संवर्गातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेतील 44 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कृषी विभाग, बांधकाम विभाग आणि कनिष्ठ अभियंता प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.
-
कल्याणच्या पुलावर भीषण अपघात
कल्याणच्या गांधी ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. रिक्षेला धडक देऊन डंपर गांधारी नदीत पडला आहे. या अपघातात रिक्षा पूर्ण चक्काचूर झाली आहे. अपघातात तीन जण जखमी झाले आहे.
-
पुणे जिल्ह्यात निम्म्या शेतकऱ्यांनी काढला नाही फार्मर आयडी
पुणे जिल्ह्यात निम्म्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढलं नाही. या आयडीसाठी सर्वाधिक जुन्नर तालुक्यात 79 टक्के तर सर्वात कमी मुळशी तालुक्यात 31 टक्के जणांनी नोंद केली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 1913 गावे असून त्यात 1 कोटी 39 लाख 101 शेतकऱ्यांची नोंद आहे. त्यापैकी 51 लाख 49 हजार 91 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. हे प्रमाण 50% इतके आहे त्यामुळे निम्म्याहून अधिक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.
-
मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा विक्रोळीत अपघात
मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा अपघात विक्रोळीमधील नारायण बोधे ब्रीजजवळ आज पहाटे सात वाजताच्या सुमारास झाला. टेम्पोने धडक दिल्याने चारचाकी दुसऱ्या मार्गावर जाऊन उलटली. दोन्ही गाड्यांमधील चालक किरकोळ जखमी झाले असून त्यांना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातामुळे दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापक आणि विक्रोळी पोलीस दाखल झाले आहेत.
-
अमरावतीमधील भाजपचे नेते, माजी मंत्री जगदीश गुप्ता लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार
अमरावतीमधील भाजपचे नेते, माजी मंत्री जगदीश गुप्ता लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी केल्याने त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. दरम्यान आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्याने जगदीश गुप्ता यांनी अमरावती विधानसभा निवडणूक ही अपक्ष लढवली होती.
समर्थकांसोबत चर्चा करून केव्हा प्रवेश करायचं हे गुप्ता ठरवणार आहेत. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रिती बंड यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला होता.
-
भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या 3 शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींचं मार्गदर्शन
भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या तीन शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आज मार्गदर्शन करणार आहेत. खासदार संजय झा, खासदार कनिमोझी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना माहिती देणार आहेत. दहशतवादाचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारत जगातील अनेक देशांमध्ये खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवत आहे. ७ शिष्टमंडळे जगातील ३२ देशांना भेट देतील आणि पाकिस्तान दहशतवादाला कसा प्रोत्साहन देत आहे हे स्पष्ट करतील. कुठल्या देशांसमोर काय आणि कशी बाजू मांडावी याबाबत परराष्ट्र सचिव आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा होणार आहे.
-
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत मंत्री विजय शाहांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणी SIT स्थापित
मध्य प्रदेश- सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राज्य सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली. मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानावर कोर्टाने SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. एसआयटीमध्ये IG प्रमोद शर्मा, DIG कल्याण चक्रवर्ती आणि SP वाहिनी सिंह यांचा समावेश आहे. SIT आपला रिपोर्ट चौकशी करून सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाने काल तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री विजय शाह यांचा माफीनामा स्वीकारला नव्हता.
-
धनंजय मुंडेंकडील खातं भुजबळांना, आज घेणार शपथ
छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडेंकडील खातं भुजबळांना मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार आहे. आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे.
Published On - May 20,2025 8:31 AM





