Maharashtra Breaking News LIVE : महादेव मुंडे यांची पत्नी- मुले जरांगे पाटील यांच्या भेटीला
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू असून, विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार आहेत. तसेच कल्याणमधील तरुणीला झालेल्या मारहाणप्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना आज मानपाडा पोलीस कल्याण न्यायालयात हजर करणार आहेत. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास त्यांना न्यायालयात सादर केले जाईल. मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्याची अधिक चौकशी करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या इतर आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच केंद्राचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. यात विरोधक सत्ताधाऱ्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
भिवंडी: वाहतूक पोलिस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी
भिवंडी तालुक्यातील भिवंडी-ठाणे मार्गावर पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलीस व वाहन चालकामध्ये हाणामारी झाली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाहन चालकाला थांबण्यास सांगितले असता, त्याने वाहन न थांबवता वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्याने हा वाद झाल्याचे समोर आले आहे.
-
वाशिम: मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुसकान झाले आहे. शेलुबाजार, कंझरा, पिंप्री खुर्द, पिंप्री अवगण गावातील शेतकऱ्यांच्या हळद, सोयाबीन, पाईप या पिकांचे नुकसान झाले आहे.
-
-
पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे उमेदवारीसाठी आग्रही
मंगेश चिवटे हे पुणे शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आझाद मैदानावरील शिक्षण आंदोलनादरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती. महायुतीतील नेत्यांनी संधी दिल्यास शिक्षकांसाठी काम करणार असं चिवटे यांनी म्हटलं आहे.
-
बुलढाणा: मोहेगावमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
बुलढाणा जिल्ह्यातील मोहेगावमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात SRPF जवानासह सात जण जखमी झाले आहेत, या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
महादेव मुंडे यांची पत्नी- मुले जरांगे पाटील यांच्या भेटीला
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांची मुले हे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले आहेत. जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून माहिती घेतली आहे.
-
-
एफआरपीचे तुकडे कराल तर याद राखा – राजू शेट्टी
न्यायालयाने ऊसाची एफआरपीचे तुकडे करता येणार नाही एक रकमी द्या असा आदेश दिला होता. अवमान याचिका दाखल केल्याशिवाय मी राहणार नाही, केंद्र सरकारचे पत्र ठरवून आणलं आहे, सरकार एका राज्यासाठी असं काही करू शकत नाही. कोणाची फसवणूक सुरू आहे? एफआरपीचे तुकडे कराल तर याद राखाअसे आव्हान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले आहे.
-
नवी मुंबईतील सर्व धर्मीय धार्मिक स्थळांना दिलासा
नवी मुंबईतील धार्मिक स्थळे अधिकृत होण्याकरिता आणि इतर विविध प्रश्नांवर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या सोबत बैठक घेतली आहे.
-
IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात भारताची सावध सुरुवात
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे सुरु आहे. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल मैदानात आहेत. या दोघांनी सावध सुरुवात केली आहे.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी 26 जुलैला गुजरात दौऱ्यावर
काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातच्या एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा 26 जुलैला होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीसाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचं म्हंटलं जात आहे.
-
राज्यसभेत 29 जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार, 16 तासांचा वेळ निश्चित
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा राज्यसभेत मंगळवार, 29 जुलैपासून सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा होईल. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांना सभागृहात उपस्थित राहण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या मुद्द्यावर कोणताही प्रस्ताव आणू नये, फक्त सर्वसाधारण चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
-
पंतप्रधान मोदी ब्रिटनला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड किंग्डम (यूके) आणि मालदीवच्या दोन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी 23 ते 24 जुलै दरम्यान ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान मोदी 25 ते 26 जुलै दरम्यान मालदीवचा दौरा करतील.
-
तो व्हिडिओ नंतरचा – कल्याणमध्ये मारहाण झालेल्या तरूणीने सांगितला घटनाक्रम
तो व्हिडिओ नंतरचा असल्याचा दावा कल्याणमध्ये मारहाण झालेल्या तरूणीने सांगितलं आहे.
त्याला (आरोपी झा) मराठीमध्ये मी आत जाऊ नको असं सांगितलं, याचा राग आल्याने त्याने मला पहिले मारहाण केली. मला मारहाण केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला बाहेर पाठवलं. नंतर मी खालून उठले आणि त्याला का पळून लावला असं विचारत त्याच्या नातेवाईकाला मारलं.
मला एवढी बेदाम मारहाण झाली मी त्यात मेली असती माझा राग त्यावेळेला मी काढला, असं स्पष्टीकरण पीडित तरुणी आणि तिच्या बहिणीने दिलं आहे.
-
अजित पवारांनी कोकाटेंचं खात बदलावं , नाहीतर स्वत:च त्या विभागाची जबाबदारी घ्यावी – रोहित पवार
माणिकराव कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांविरोधात विधानं करतात . अजित पवार यांनी कोकाटेंचं खात बदलावं , नाहीतर स्वत:च त्या विभागाची जबाबदारी घ्यावी – अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
-
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे मनोज रंगे पाटील यांच्या भेटीसाठी परळी येथून रवाना झाल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच पाटील यांनी मुंडे कुटुंब अशी भेट घेतली होती
मनोज पाटील यांनी मुंडे यांच्या बंधूला फोन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासाठी बोलवले आहे. या दोघांमध्ये काय संवाद होतील ते पाहणं महत्वाचं आहे
-
कल्याण- रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण प्रकरणात नवा व्हिडीओ समोर
कल्याण- रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण प्रकरणात नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्या रिसेप्शनिस्ट तरूणीने , आरोपी झा याच्या वहिनीला कानशिलात लगावल होती असे समोर आले आहे. त्यानंतर संतप्त गोकूळझाने त्या रिसेप्शनिस्ट तरूणीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
-
नवी मुंबई – गटारीनिमित्त एका माजी नगरसेवकाने वाटलं चक्क चिकन
नवी मुंबईच्या नेरूळ येथे गटारीनिमित्त एका माजी नगरसेवकाने चक्क चिकन वाटले आहे. नेरुळ सेक्टर २, ३ व जुई पाडा गाव जुईनगर मधील नागरिकांना तब्बल अडीच हजार किलो चिकन वाटण्यात आले आहे. हे चिकन खरेदी करण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी झाली. ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
-
डोंबिवलीतील एमआयडीसीतील एका कापड प्रक्रिया कंपनीला लागली आग
डोंबिवलीतील एमआयडीसीतील एका कापड प्रक्रिया कंपनीला लागली आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीचे नाव एरोसेल असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
-
मला आतापर्यंत जो काही त्रास देण्यात आला त्यात नाना पाटेकरांचाही सहभाग; तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप
तनुश्री दत्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता स्पष्टिकरण देत तिने पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ” मला आतापर्यंत जो काही त्रास देण्यात आला त्यात नाना पाटेकरांचाही सहभाग आहे. माझ्यासोबत अनेक विचित्र घटना घडत आहेत. “असे अनेक गंभीर आरोप तनुश्री दत्ताने केले आहेत.
-
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची होणार घोषणा
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा होणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिला गेला होता तर 2024मध्ये सुद्धा मूर्ती यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आता यंदा हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
शाळेची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड;विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काही अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची घटना समोर आली. यामध्ये शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले तर सौर ऊर्जा प्लेट आणि पिण्याच्या पाण्याच्याही नळाचं तोडफोड करून मोठं नुकसान केलं.घडलेल्या या प्रकारामुळे शाळेचे मोठे नुकसान झालं असून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यामुळे गुन्हेगारांना ओळखणे कठीण झाले असून सौर ऊर्जा पॅनल ची वायरिंगही तोडून नेण्यात आली असल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला.
-
दारू न पाजल्यामुळे दोघांकडून तरुणाला अमानुष मारहाण
गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव येथे सोमवारी रात्री 8 वाजेच्या दरम्यान बाबु अशोक माने या तरूणाला सतीश फुलझळके आणि दिनकर फुलझळके या दोघांनी तू आम्हाला दारू का पाजली नाही? असे म्हणत हातातील कड्याने कपाळावर आणि डोक्याच्या पाठीमागे मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाबु माने यांच्यावर गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेवराई पोलिसात बाबु माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी सतीश फुलझळके आणि दिनकर फुलझळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊसाचा धुमाकूळ
सकाळपासून मुंबई उपनगरात अधूनमधून पाऊस पडत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली आहे. बोरिवली ते मुंबई या मार्गावर अंधेरी पुलापर्यंत वाहतूक कोंडी आहे.
-
कोस्टल रोडवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा
मुंबईच्या कोस्टल रोडला नेवीच्या गाडीला अपघात झाल्याने काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. वरळीहून नरिमन पॉईंटच्या दिशेनं बोगद्याच्या आत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसल्या. ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.
-
ट्रॅव्हल्स मालक आणि ग्राहक यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी
बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील श्री बालाजी ट्रॅव्हल्समध्ये स्थानिक प्रवासी बंडु थोरात यांचा ट्रॅव्हल्सच्या चालकासोबत AC लावण्याच्या कारणावरून सुरुवातीला वाद झाला होता. यानंतर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून बंडू थोरात आणि इतर लोकांनी सुरुवातीला दादागिरी करत मारहाण केली. ट्रॅव्हल्स मालक बालाजी जावडे आणि प्रवासी बंडू थोरात यांच्यामध्ये श्री बालाजी ट्रॅव्हल्स च्या कार्यालयातच रविवारी 7:30 वाजता वाद झाला यामध्ये दोघांकडूनही एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे
-
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद आहे. आम्हाला विश्वासात न घेता जी पार्किंगची जागा इतर संघटनेला दिली, ती आमच्याकडे परत द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ही जागा आमच्याच हक्काची आहे. आम्ही आज एकदिवसीय लक्षणिक बंद केला आहे, मात्र दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर सोमवारपासून बेमुदत बंद करू असा इशारा दिला आहे.
-
पुण्यात कोकाटेंविरोधात शरद पवार राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
पुण्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात शरद पवार राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन चर्चेत आले आहे. पत्ते खेळून आंदोलन करण्यात येत आहे. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सोरट, जुगाराशिवाय या राज्याला पर्याय नाही असा टोला कार्यकर्त्यांनी लगावला.
-
मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस
मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने मोठा फटका बसला आहे.
-
अजितदादा-तटकरे यांच्यात बैठक
शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. माणिकराव कोकाटे यांचं विधान , लातूरमधील मारहाण प्रकरण, सुनील तटकरे यांनी केलेला दौरा आणि पक्षाची सध्याची स्थिती यावर चर्चा होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे.
-
विरोधी पक्षांमागे जनाधार नाही – गिरीश महाजन
मला वाटतं विरोधी पक्षांच्या मागे जनाधार राहिलेला नाही. त्यांना कोणी लोक मतदान करायला तयार नाही, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. एवढ्या मोठ्या बहुसंख्येने लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने झपाट्याने पुढे जात आहोत आणि त्यामुळे यांना सांगायला काहीच राहिलेले नाही अडीच वर्षाच्या कार्यकाळात यांनी काहीच बोंब पाडलेली नाही आणि म्हणून आता सरकारला बदनाम कसं करायचं तर यांच्याकडे हा एकच विषय आहे, असे ते म्हणाले.
-
कल्याण येथे न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कल्याण पूर्वेतील तरुणीला मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा दोन्ही आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याने पोलिसांनी लावला बंदोबस्त. काल मनसेच्या इशाऱ्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त लावल्याची माहिती. अकरा वाजता न्यायालय सुनावणी सुरू होणार असून त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी देखील पोलीस या ठिकाणी मागणी करणार असल्याची माहिती.
-
अजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी
अजली दमानिया यांच्याकडून सावली बारची पाहणी. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बारचा परवाना. सावली बारमध्ये अटीशर्तींच उल्लंघन झालं होतं असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. योगेश कदम यांच्या राजीनाम्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार असल्याच त्यांनी सांगितलं.
-
विधिमंडळात व्हिडिओ शूट त्यावर तटकरे काय म्हणाले?
विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ शूट करण्यात आला त्याबद्दल पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारलं. ते म्हणाले की, “विधान भवनाच्या अखत्यारितील संबंधातील हा विषय आहे. हा भाग विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींच्या नियंत्रणाखाली येतो. जे शूटिंग झालं, ते उचित नव्हतं. व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय”
-
माणिकराव कोकाटेंवर अजित पवार भूमिका घेतील – सुनील तटकरे
माणिकराव कोकाटे यांच्या विषयावर मी एकदा बोललो आहे. अधिक बोलणं उचित वाटत नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या संदर्भातील पुढील भूमिका घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
-
कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी आज आरोपींना कोर्टात हजर केले जाणार
कल्याणमधील तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना आज मानपाडा पोलीस कल्याण न्यायालयात हजर करणार आहेत. सकाळी ११ ते १२ च्या सुमारास त्यांना न्यायालयात सादर केले जाईल. मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने, पोलीस त्याची सखोल चौकशी करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या इतर आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
महादेव मुंडेंचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती नमूद
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. महादेव मुंडे यांचा आगोदर गळा कापला. तब्बल २० सेमीपर्यंत लांब, ८ सेमी रूंद आणि ३ सेमी खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. मुंडे यांच्या अंगावर तब्बल १६ वार आहेत. विशेष म्हणजे प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमुद आहे.
-
हनी ट्रॅप प्रकरणी मान्यवरांची नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक, गुप्तपणे चौकशी सुरु
नाशिक शहरातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर आणि शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील ‘मान्यवरांची नावे ऐकण्यास नाशिककर उत्सुक’ अशा आशयाचे फलकही शहरात लावण्यात आले आहेत. सध्या गुप्तचर विभागाकडून या हनी ट्रॅप प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. संशयित हॉटेल चालक आणि काही महसूल अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कथित व्यवहारांची देखील गुप्तपणे चौकशी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची शहरात आणि सोशल मीडियावर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, यात अडकलेल्या मान्यवरांची नावे खरंच उघड होतील का, यावर चर्चांना उधाण आले आहे.
-
संसदेचे अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेल्याने विरोधक हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर या विषयावर मोदींनी सभागृहात उत्तर द्यावे, अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. यामुळे संसदेतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
-
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा निर्णयाबद्दल मुंबईत लवकरच बैठक
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य शिखर पाडण्याबाबत लवकरच मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, अशी माहिती मंदिर संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या पथकाने आतापर्यंत तीन वेळा तुळजाभवानी मंदिरातील मुख्य शिखराची पाहणी केली असून, त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. यापूर्वी मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शिखराच्या या निर्णयाला पुजाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांनीही तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन मुख्य शिखर पाडण्यास विरोध दर्शवला होता.
-
नाशिकमध्ये गोदावरीच्या 6 घाटांवर महाआरती
नाशिकमध्ये कुंभमेळा ध्वजारोहणानंतर गोदावरी नदीकाठी सहा ठिकाणी भव्य आरती केली जाणार आहे. रामतीर्थ सेवा समितीने आयोजित केलेल्या या आरतीचा मुख्य उद्देश भाविकांना गोदा आरतीमध्ये सहभागी करून घेणे आणि गोदावरी स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा आहे. रामतीर्थ ते तपोवनपर्यंतच्या सहा वेगवेगळ्या घाटांवर ही आरती केली जाईल. या विशेष आरतीसाठी तब्बल २१०० मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
-
नाशिकमध्ये प्रार्थनास्थळांवरील ७५ भोंगे काढले
नाशिक शहरात मुंबई नाका आणि भद्रकाली परिसरातील विविधधर्मीय प्रार्थनास्थळांवरून आतापर्यंत ७५ भोंगे काढण्यात आले आहेत. हे भोंगे कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आले होते. धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि नाशिक पोलिसांमध्ये झालेल्या सामंजस्यपूर्ण चर्चेनंतर हे भोंगे हटवण्याची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनापरवानगी लावलेले भोंगे काढण्याचे आदेश होते. शहरातील इतर भागांमध्येही विनापरवानगी लावलेले भोंगे काढण्यासंदर्भात नाशिक पोलिसांची चर्चा सुरूच राहणार आहे.
-
मराठवाड्यासाठी मोठा दिलासा, पुढील वर्षीपासून वैतरणा धरणातील १६.५० टीएमसी पाणी मिळणार
सततच्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील घारगाव-इगतपुरी येथील ऊर्ध्व वैतरणा धरणातील अतिरिक्त १६.५० टीएमसी पाणी पुढील वर्षी मराठवाड्याला मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे १६.५० टीएमसी पाणी वैतरणा धरणातून मुकणे धरणाद्वारे मराठवाड्याला उपलब्ध करून दिले जाईल. नदी जोड प्रकल्पांतर्गत हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडी प्रकल्पात पोहोचेल.
Published On - Jul 23,2025 9:09 AM
