Mumbai Rain : पावसाचा जोर वाढला, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची दाणादाण, लोकल रखडल्या; कुठं काय स्थिती?
मुंबईमध्ये मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळत आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला असून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा मुंबईसह मुंबई उपनगरात धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. सलग दोन ते तिसऱ्या दिवस रात्रभर पाऊस कोसळत असल्याने गेल्या १५ दिवसांपासून काहिसा कमी झालेला पाऊस आपली कसर भरून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गाच्या लोकल सेवेवर परिणाम झाला असून त्या उशिराने धावत आहेत. पावसाचा फटका लोकल सेवेला बसल्याने १० ते १५ मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसतेय. पहिल्याच आठवड्यात लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागतोय. तर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात रात्रभर पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.
