Maharashtra Breaking News LIVE 21 January 2025 : अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
बेकायदेशीर बांगलादेशींना बाहेर काढले पाहिजे
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जिथे कोणीही बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत असेल, त्याला लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावे. सैफ अली खानच्या घरी घडलेली घटना अतिशय चिंताजनक आहे. मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी हे ऑडिट आवश्यक आहे.
-
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी नेते शिवालयवर दाखल
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. यासाठी शिवालयावर नेते येण्यास सुरुवात झाली आहे. जयंत पाटील, नाना पटोले आणि नसीम खान या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
-
-
सैफ अली खान घरी पोहोचला
अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तो त्याच्या घरी पोहोचला आहे. घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 15 जानेवारीच्या रात्री त्याच्यावर हल्ला झाला.
-
नाशिकमध्ये कुंभमेळा आहे म्हणून ती जागा भाजपाला हवी- बावनकुळे
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा असल्याने ती जागा भाजपाला हवी आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भूमिका समजून घेतली पाहीजे, असं बावनकुळे यांनी पुढे सांगितलं.
-
पालकमंत्रिपद वाटपावरून शिवसेनेनंतर अजितदादा गटातही धुसफूस
पालकमंत्रिपद वाटपावरून शिवसेनेनंतर अजितदादा गटातही धुसफूस सुरु झाली आहे. स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे देण्यात आले. राष्ट्रवादीच्या 10 पैकी केवळ अजितदादांनाच स्वजिल्हा देण्यात आला.
-
-
देशमुख कुटुंबियांनी भेटण्यासाठी न येण्याची विनंती केली- पंकजा मुंडे
देशमुख कुटुंबियांनी भेटण्यासाठी येऊ नये अशी विनंती केली होती, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. कुटुंबियांच्या विनंतीनंतर मस्साजोगमध्ये गेले नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. वहिनी आणि पंकजा मुंडे यांचं फोनवरून बोलणं झालं होतं, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
-
अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज
मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ अली खान थोड्याच वेळात त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी पोहचणार आहे. सैफ अली खान याच्यावर गेली काही दिवस लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. सैफवर काही दिवसांपूर्वी राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता सैफला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
-
-
सांगलीतील मध्यवर्ती बस स्थानकातील काँक्रिटीकरणांचं काम सात महिन्यांपासून रखडलं, स्थानिकांना मनस्ताप
सांगली जिल्ह्यातील मध्यवर्ती बस स्थानकामधील काँक्रिटीकरणाचं काम हे गेल्या 7 महिन्यांपासून रखडलं आहे. त्यामुळे याचा परिणाम सांगलीच्या बरोबर परिसरातील छोटे-मोठे व्यवसायिक आणि रिक्षाचालकांच्या वर झाला आहे. प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाचे काँक्रिटीकरण आणि पत्रे बदलण्याचे काम करण्यात येत आहे.त्यामुळे थोड्या जागेत एसटी सेवा कशी-बशी सुरू आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून काम पूर्ण झालेलं नाही. परिणामी एसटी सेवा विस्कळीत झालीय. तर प्रवाशांना देखील मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
-
बोगस पिकविमा घोटाळा: शेतजमीन स्वत:ची असल्याचं दाखवत 565 शेतकऱ्यांनी ऑनलाईन पिकविमा काढला
बोगस पिकविमा घोटाळा प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर विमा भरलेले 565 शेतकरी दोषी असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल. जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेतजमीन स्वत:ची असल्याचे दाखवून 565 शेतकऱ्यांनी 1 हजार 170 अर्जाद्वारे ऑनलाईन पिकविमा काढला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ सोलापुरात निदर्शने. सोलापुरातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने आंदोलन करण्यात आलं, तर पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा अशी आंदोलकांनी मागणी केली आहे.
-
सैफ अली खानच्या घराच्या बाल्कनीला जाळी बसवण्याचं काम सुरु; सुरक्षेत वाढ
सैफ अली खानच्या घराच्या बाल्कनीला जाळी बसवण्याचं काम सुरु आहे. सुरक्षेत वाढ म्हणून सैफच्या घराच्या बाल्कनीला जाळी बसवण्याचे काम सुरु. बाल्कनीत आता कोणालाही आत येणं शक्य होऊ नये यासाठी ही जाळी बसवण्याचे काम सुरू आहे.
-
नवीन पनवेलच्या पिल्लई महाविदयालयावर पनवेल मनसेची धडक
पनवेलच्या पिल्लई महाविदयालयावर मनसेचा आक्रमक मोर्चा पाहायला मिळाला.पिल्लई कॉलेज मध्ये दरवर्षी होणाऱ्या “ॲलेग्रिया” या कार्यक्रमासाठी मनसेने आक्षेप नोंदवला आहे. मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या सुचनेवरून मनसेचे अनेक कार्यकर्ते पिल्लई महाविद्यालयाच्या “ॲलेग्रिया” या वार्षिक महोत्सवास विरोध करण्यासाठी महाविद्यालयावर धडकले. अश्लिलतेला प्रोत्साहन देणारा , महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान करणारा आणि बिभित्सतेने भरलेला “ॲलेग्रिया” आम्ही होऊ देणार नाही अशी भुमिका मनसेने घेतलेली आहे.
-
पीक योजना बंद होणार?
एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी 100 रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडली आहे. एक रुपयांत पीक विमा योजना बंद होणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
-
आम्हाला न्याय द्या -धनंजय देशमुख
आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्यायला पाहिजे मात्र न्यायासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे, यापेक्षा नायक कसा मिळाला पाहिजे किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे हे पण तेवढेच महत्त्वाच आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
-
शिरूरमध्ये हवेत गोळीबार
चार वर्षापूर्वी इन्कम टॅक्स ला अर्ज केल्याच्या कारणावरून दहशत करण्यासाठी छातीवर पिस्तूल रोखत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. किराणा दुकानदारावर दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. प्रकरणात एकाविरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
राजू पाटील यांची सडकून टीका
गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले, अशी सडकून टीका राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही आता पालकमंत्री झाले तर काय होणार. आमच्या अपेक्षा होत्या मात्र फक्त घोषणा झाल्या, असे ते म्हणाले.
-
वाल्मिक कराडप्रकरणात माजी नगरसेवकांची चौकशी
वाल्मिक कराड याचे पुण्यात मालमत्ता आहे. भाजपाचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.
-
संभाजीनगर मधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा आज भाजपात पक्ष प्रवेश
संभाजीनगर मधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा आज भाजपात पक्ष प्रवेश होणार आहे. आज दपारी 1.30 वाजता प्रदेश कार्यालयात मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा पार पडेल.
-
सैफ अलीचा मुक्काम आता फार्च्युन हाईट्समध्ये
हल्लेखोराच्या हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खान याचा मुक्काम आता फार्च्युन हाईट्समध्ये हलवण्यात येत आहे. सैफ अली खानचे सामान सतगुरु शरण येथून फॉर्च्युन हाइट्समध्ये शिफ्ट केले जात आहे. अभिनेता सैफ अली खानचे दुसरे घर वांद्रे येथील फॉर्च्युन हाइट्समध्ये आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराज येथे जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराज येथे जाणार आहेत. तर 27 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील प्रयागराजला जाणार आहे. तेथे ते महाकुंभ मेळ्यात जाऊन अमृत स्नान करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाचा दणका
समीर वानखेडे यांनी केलेली याचिका हायकोर्टाने निकाली काढत वानखेडे यांना मोठा दणका दिला आहे.
नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल असताना पोलिस कारवाई करत नाही. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी समिर वानखेडे यांनी केली होती मागणी. त्यावर कोर्टाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते . चौकशी अंती पोलिसांनी सी समरी दाखल केली आणि न्यायालयाने समिर वानखेडे यांची याचिका निकाली काढली. नवाब मलिक यांच्यावर दाखल गुन्ह्यात सी समरी दाखल झाल्याने मलिकांना मोठा दिलासा.
-
कोल्हापूर – जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यामध्ये आढळलं ब्लेड
कोल्हापूर – जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याने खळबळ. मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या प्रसादामध्ये ब्लेड सापडल्याने खळबळ माजली आहे. संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
-
पालकमंत्रीपदावरून रुसवे-फुगवे धरायला हे तुमचं घर नाही – सुप्रिया सुळेंचा टोला
पालकमंत्रीपदावरून रुसवे-फुगवे धरायला हे तुमचं घर नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
-
Maharashtra News: बीडच्या आष्टीमधील धककादायक घटना…
HIV मुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवून खोटी माहिती पसरवून बदनामी केली… असं वक्तव्य कुटुंबियांनी केलं आहे. HIV अफवेमुळे पीडितेनं आधी 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत…
-
Maharashtra News: पोलिसांची टीम पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी पोहोचली
सकाळी सैफ अली खानच्या घरी सीन रिक्रिएट केल्यानंतर मुंबई पोलिसांची टीम पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरी पोहोचली आहे… सीन रिक्रिएशननंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि तेथे त्याची चौकशी केली… त्यानंतर आरोपीने काही पोलिसांना माहिती दिली आणि त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस सैफ अली खानच्या घरी पोहोचले…
-
Maharashtra News: चंद्रपूर जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांचे अनुदान पाच महिन्यापासून रखडले
अनुदान वारंवार थकीत राहत असल्याने शिवभोजन केंद्र संचालकांची अडचण… दहा रुपये नाममात्र दरात एक वेळचे पोटभर जेवण देणारी ही योजना नागरिकांच्या दृष्टीने आहे महत्त्वाची… मात्र अनुदानात सातत्य नसल्याने केंद्र संचालक हतबल… ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची व्यक्त होत आहे गरज…
-
Maharashtra News: धाराशिवमध्ये झळकले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अभिनंदनाचे बॅनर
धाराशिवचे पालकमंत्री म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांची निवड झाल्यानंतर धाराशिव शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत…
-
Maharashtra News: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं केला पहिला सर्व्हे
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं केला पहिला सर्व्हे केला आहे. सर्व्हेत भाजपच्या माजी नगरसेवकांचा रिपोर्ट कार्ड नकारात्मक आल्याची माहिती समोर येत आहे. 30 – 40 टक्के माजी नगरसेवकांचा रिपोर्ट कार्ड नकारात्मक असल्याची माहिती….
-
आर्थिक व्यवहारासाठी पालकमंत्री पदावरुन दंगल – संजय राऊत
आर्थिक व्यवहारासाठी पालकमंत्री पदावरुन दंगल. फडणवीस उदय सामंत यांच्यासोबत दावोसला गेल्याने एकनाथ शिंदे नाराज असं संजय राऊत म्हणाले.
-
अक्कलकोटमध्ये निषेध मोर्चा
कर्नाटकात बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर अक्कलकोटमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली होती. त्याचा निषेध व्यक्त करत अक्कलकोट येथे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
-
शरद पवार आज पुण्यात
शरद पवार आज पुण्यात. शरद पवार पुण्यातील मोदी बागेत असणाऱ्या त्यांच्या कार्यालयात दाखल. मोदी बागेत शरद पवार कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी. दुपारी तीन वाजता शरद पवार सारथी संस्थेला देणार भेट.
-
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मोठं कोम्बिंग ऑपरेशन सुरू
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात छत्तीसगड पोलीस सीआरपीएफकडून मोठं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येतंय. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान नक्षल ऑपरेशनवर आहेत. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचंही लक्ष छत्तीसगड राज्याकडे आहे. छत्तीसगड पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि सीआरपीएफ कडून केलेल्या ऑपरेशनावर गृह मंत्रालय सतत पाठपुरावा घेत आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती जंगलात भागात ऑपरेशन सुरू झाल्याची माहिती आहे.
-
बीड: 13 सरपंचांचे सदस्यत्व रद्द
बीड: 13 सरपंचांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. 418 ग्रामपंचायत सदस्यांचेही सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली. जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने कारवाई केली.
-
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. अप लाईनवरील गाड्यांच वेळापत्रक खोळंबणार आहे. गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबल्या आहेत.
-
मिरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पाच गृहप्रकल्पांच्या बांधकामांना स्थगिती
मिरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पाच गृहप्रकल्पांच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन केले जात नसल्याने पालिकेने ही कारवाई केली आहे. वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्याकडे विकासकांकडून दुर्लक्ष करण्यात आले होते.
-
कोल्ड प्ले बँडचा आज शेवटचा शो; स्टेडियमजवळील सर्व वाईन शॉप ठेवणार बंद
नवी मुंबई- कोल्ड प्ले या जगप्रसिद्ध बँडचा आज शेवटचा शो नेरुळ इथल्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेडियमजवळ असलेले सर्व वाईन शॉप बंद करण्यात येणार आहेत. नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी हे वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज एक दिवस सर्व वाईन शॉप बंद असणार आहेत.
-
चंद्रपूर- सिंदेवाही तालुक्यातील पांगडी जंगलात वाघाचा मृत्यू
चंद्रपूर- सिंदेवाही तालुक्यातील पांगडी जंगलात वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात हे जंगल येतं. मृत्यू झालेला वाघ हा अंदाजे 2 वर्षांचा नर आहे. स्वतःची टेरिटरी तयार करत असताना काही दिवसांपूर्वी या वाघाची दुसऱ्या एका वाघासोबत झुंज झाली होती. या झुंजीत हा वाघ जबर जखमी झाला होता. अखेर त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय.
-
अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरात शिरून एकाने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात सैफला सहा जखमा झाल्या होत्या. सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं समजतंय. दुसरीकडे, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून कोणताही वाद नाही, असा निर्वाळा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी सोमवारी दिला. राज्यातील या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे विजयी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेततली. शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 हा स्वातंत्र्य दिवस म्हणून जाहीर केला. मनोरंजन क्षेत्रात अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
Published On - Jan 21,2025 8:11 AM





