Amitabh Bachchan : KBC च्या सेटवर बिग बी झाले इमोशनल, थेट मागितली माफी; काय घडलं ?
केबीसी १८ मध्ये अमिताभ बच्चन आपल्या पूर्वजांच्या बाबू पट्टी गावातील आठवणी सांगताना भावुक झाले. जया बच्चन यांच्या कल्पनेतून उभारलेल्या ग्रंथालयाच्या रखडलेल्या कामासाठी त्यांनी गावकऱ्यांची माफी मागितली.

टीव्हीवरील लोकप्रियय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपति-18’ (KBC) सध्या बराच चर्चेत आहे. एरवी आमपल्या दमदार आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेणार, मजेशीर संवादाने अनेकांना हसवणारे आणि उत्तमरित्या हा शो होस्ट करणारे अमिताभ बच्चन,(Amitabh Bachchan ) हे या शो मध्ये नुकतेच इमोशनल झालेले दिसले. या मंचावर बिग बी, हे त्यांच्या पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. शोदरम्यान कंटेस्टंट चंद्र प्रकाश तिवारी यांनी त्यांचा संबंध प्रतापगढशी असल्याचं सांगितलं. यावेळी ‘बाबू पट्टी’ या गावाचा उल्लेख होताच अमिताभ बच्चन यांनी आपल्या पूर्वजांच्या गावाच्या आठवणी शेअर केल्या. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, बाबू पट्टी हे त्यांच्या पूर्वजांचे जन्मस्थान आहे. त्यांचे वडील आणि प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांचंही या गावाशी जवळचे नातं होतं. “बाबू पट्टी आमच्या पूर्वजांचे जन्मस्थान होते आणि बाबूजी त्या ठिकाणाहून आले होते” असं आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ म्हणाले.
जया बच्चन यांनी सुचवली होती लायब्ररीची कल्पना
अमिताभ बच्चन यांनी पुढे सांगितले की, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी गावातील मुलांसाठी लायब्ररी उभारण्याची कल्पना मांडली होती. जया बच्चन या जेव्हा गावाला भेट देण्यासाठी अमिताभ यांच्यासोबत गेल्या, तेव्हा या गावात मुलांसाठी वाचनाची योग्य सुविधा नसल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी गावात मुलांसाठी लायब्ररी उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, लायब्ररीची इमारत तयार होऊनही काही अडचणींमुळे अद्याप तेथे आवश्यक सुविधा, पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध करून देता आलेली नाही. त्यामुळे लायब्ररी अद्याप सुरू झालेली नाही.
अमिताभ बच्चन यांनी गावकऱ्यांची मागितली माफी
लायब्ररी सुरू होण्यास झालेल्या विलंबाबद्दल अमिताभ बच्चन यांनी KBCच्या मंचावरून बाबू पट्टीच्या ग्रामस्थांची माफी मागितली. तसेच लायब्ररी लवकरच सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. अमिताभ बच्चन म्हणाले, “बाबू पट्टीच्या रहवाशांची मी माफी मागतो. KBCच्या मंचावरून आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. लायब्ररी लवकरच सुरू होईल. इमारत तयार आहे. आता त्यामध्ये आवश्यक साहित्य आणि पुस्तके ठेवली जातील, जेणेकरून गावातील मुलांना तिथे अभ्यास करता येईल आणि वाचनाची सुविधा मिळेल.” असं आश्वासन बिग बींनी यावेळी दिलं.
2006 मध्ये उभारण्यात आलं होतं स्मारक ग्रंथालय
विशेष म्हणजे, दिवंगत कवी हरिवंश राय बच्चन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2006 मध्ये ‘डॉ. हरिवंश राय बच्चन स्मारक ग्रंथालय’ उभारण्यात आलं होतं. जया बच्चन आणि माजी खासदार अमर सिंह यांच्या उपस्थितीत या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र, उद्घाटनानंतर योग्य देखभाल न झाल्याने आणि काही अडचणी निर्माण झाल्यामुळे हे ग्रंथालय अपेक्षित पद्धतीने सुरू राहू शकले नाही. कालांतराने ग्रंथालयाची इमारतही जीर्ण झाली. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतः पुढाकार घेत लायब्ररी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने बाबू पट्टीतील ग्रामस्थ आणि विशेषतः गावातील मुलांसाठी ही मोठी आशा निर्माण झाली आहे.
