राकेश बापट ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर येताच पूर्व पत्नी दुसऱ्या लग्नाबद्दल स्पष्टच म्हणाली..
'बिग बॉस मराठी 6' संपताच आणि त्यातून राकेश बापट बाहेर पडताच पूर्व पत्नी रिधी डोग्रा दुसऱ्या लग्नाविषयी व्यक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने दुसऱ्या लग्नाविषयी भाष्य केलं. रिधी नेमकं काय म्हणाली, जाणून घ्या..

अभिनेता राकेश बापट नुकताच 'बिग बॉस मराठी 6'मधून बाहेर पडला. ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेनं बाजी मारली आणि राकेशच्या पदरात पुन्हा निराशाच आली. आता तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्रा दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

राकेश बापट आणि रिधी डोग्रा यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतरही या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. युविका चौधरीच्या पॉडकास्टमध्ये रिधी प्रेम आणि लग्नाबद्दल व्यक्त झाली.

"माझ्यासाठी प्रेम म्हणजे देव आहे. ते प्रत्येक ठिकाणी असतं. प्रेम म्हणजे फक्त रोमान्सच नाही, तर जिथे द्वेष असतो तिथेही प्रेम असतं. प्रेम नसेल तर काहीच नाही. मी फार रोमँटिक स्वभावाची आहे. मी प्रेमासाठी नेहमीच ओपन असते. परंतु लग्न हा एक करार असतो", असं रिधी म्हणाली.

लग्नाबद्दल तिने पुढे सांगितलं, "लग्न हे एक कमिटमेंट आहे. लग्न केलं तर तुम्हाला त्यात टिकून राहावं लागेल. मला कसा पार्टनर हवा, असा प्रश्न असेल तर माझी काही ठरलेली चेकलिस्ट नाही. मला माझ्या पार्टनरमध्ये काही सर्वसामान्य गुण हवेत."

"मला अशी व्यक्ती आवडेल, जी 'सेल्फ मेड' म्हणजेच स्वत:च्या बळावर नाव कमावलेली असेल. तो समोरच्या पर्सनॅलिटीचा आदर करणारा हवा. एक अशी व्यक्ती जी स्वत:बद्दल नाखुश नसेल. मी माझ्या आयुष्यात आता सुरक्षित आणि स्वतंत्र आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात येऊन माझ्याबद्दल असुरक्षित राहणारी व्यक्ती मला नकोय. मी स्वत:ची काळजी घेऊ शकते, घर चालवू शकते, आर्थिक गोष्टी हाताळू शकते. अशी व्यक्ती भेटली की मी लगेच प्रेमात पडेन", असं रिधी म्हणाली.