
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राची आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गरिमा यांच्या निधनाने मल्होत्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडस्ट्रीतील बरेच कलाकार गरिमा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मनीषच्या घरी पोहोचले आहेत. मुंबईतल्या मनीष मल्होत्राच्या घरी अभिनेत्री मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, वरुण धवन, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर, फातिमा सना शेख, करण जोहर हे सेलिब्रिटी पोहोचले आहेत. मनीषची आई गरिमा या त्याच्यासोबतच मुंबईतल्या बंगल्यात राहत होत्या. राहत्या निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं कळतंय.
याआधी मनीष मल्होत्राने 18 नोव्हेंबर 2019 रोजी वडिलांना गमावलं होतं. वयाच्या नव्वदीनंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. 2024 मध्ये ‘मदर्स डे’निमित्त मनीषने त्याच्या आईसाठी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘माझी आई, माझी ताकद, प्रेरणा, साथीदार. मी त्यांच्यासोबत नेहमीच प्रेमाने आणि आदराने राहिलो आहे. आज सकाळीच मी चहा पिताना मला फॅशन डिझाइनिंग आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत होतो. सर्वांना मदर्स डेच्या शुभेच्छा’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.
मनीषचं त्याच्या आईशी फार जवळीक होती. विविध मुलाखतींमध्ये तो आईविषयी असलेल्या प्रेमाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. “मी 5-6 वर्षांचा असल्यापासूनच कपडे आणि चित्रपट यांच्यावर प्रेम करू लागलो होतो. मी प्रत्येक गाण्यावर डान्स करायचो. आईच्या साड्यांपासून मी बरेच कपडे बनवले होते. माझी आई फाळणीपूर्वीच्या हिंदुस्तानची आहे आणि तिला तिच्या इंग्रजीबद्दल नेहमीच काळजी वाटायची. त्यामुळे मला इयत्ता पहिलीपासूनच त्यांनी इंग्रजी भाषेसाठी ट्युशन लावला होता. माझी ट्युशन टीचर आईकडे नेहमी माझी तक्रार करायची की तुमचा मुलगा अभ्यास कमी करतो आणि माझ्या कपड्यांबद्दल, चपलांबद्दल प्रतिक्रिया देत असतो. कपडे आणि चित्रपटांबद्दलच्या माझ्या प्रेमाला आईनेच प्रोत्साहन दिलं”, अशी आठवण त्याने एका मुलाखतीत सांगितली होती.