जगभरात अशांतता वाढली, योगातूनच शांतता मिळेल…,आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममधून नरेंद्र मोदी यांचा संदेश
योगाला एक जनआंदोलन बनवू या. योगच जगाला शांती, आरोग्य आणि सौहार्दाकडे घेऊन जाईल. जिथे लोक आपला दिवस योगाने सुरू करतील. जिथे योग मानवतेला एकत्र बांधण्याचे माध्यम बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

International Yoga Day Updates: जगभरात अशांतता वाढली आहे. या वेळी योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळतो. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योग सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे. योगाला एक जनआंदोलन बनवू या. हे आंदोलन जगाला शांती, आरोग्य आणि समरसताकडे घेऊन जाईल. या आंदोलनात प्रत्येक व्यक्ती दिवसाची सुरुवात योगाने करेल. या आंदोलनात सर्व समाज योगामुळे एकत्र येईल. योग मानवतेला एका सुत्रात आणेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले.
योग जीवन शैलीचा भाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी योगाचे महत्व सांगितले. जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या दशकातील योगाच्या प्रवासाकडे पाहताना मला अनेक गोष्टी आठवतात. ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा, असा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी जगभरातील १७३ देशांनी आपणास पाठिंबा दिला. आजच्या जगात असा पाठिंबा मिळणे ही सामान्य गोष्ट नाही. हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता, तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता. आता ११ वर्षांनंतर आपण पाहतो की योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.
योगाला एक जनआंदोलन बनवू या
योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपले दिव्यांग मित्र योगशास्त्राचा अभ्यास करतात हे पाहून मला अभिमान वाटतो. शास्त्रज्ञ अवकाशात योग करतात. सिडनी ऑपेरा हाऊसच्या पायऱ्या असोत, एव्हरेस्टची शिखरे असोत किंवा समुद्राचा विस्तार असो, सर्वत्र एकच संदेश मिळत आहे. देशात लठ्ठपणाचा वाढत आहे. यामुळे लोकांनी जेवणातील तेलाचे प्रमाण १०% कमी करावे. सकस आहाराचे सेवन करावे आणि योगाला एक जनआंदोलन बनवू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
