
फलटण येथील शासकीय रूग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांनी टोकाचा निर्णय घेत हातावर एक नोट लिहित थेट आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर आरोप नोटमध्ये करण्यात आली. संपदा मुंडे यांनी आरोपी पीएसआयने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचेही स्पष्ट नोटमध्ये म्हटले. संपदा यांच्या आत्महत्येबद्दल कळातच पीएसआय गोपाळ बदने हा फलटणमधून फरार झाला. प्रशांत बनकर याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातूनच अटक केली. आरोपी गोपाळ बदने याने फलटण सोडताच मोबाईल फोन बंद केला आणि पोलिसांचे पथक आपला माघ घेणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. आरोपीचे शेवटचे लोकेशन पंढरपूर होते.
अनेक प्रयत्न करूनही आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचे लोकेशन मिळत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फ करत असल्याचा निरोप पाठवताच हातात काहीच राहिले नसल्याने आरोपी पोलिसांना शरण आला. आता संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने नेमका कुठे कुठे फिरत राहिला, याची धक्कादायक अशी माहिती पुढे आलीये.
आरोपी बदने हा पंढरपूरहून थेट दोन दिवसांमध्ये सोलापूरला गेला. हेच नाही तर पोलिसांना चकवा देत तो थेट आपल्या बीडच्या घरी देखील जाऊन आला. यावेळी तो त्याच्या कुटुंबियांना भेटल्याचेही सांगितले जातंय. यादरम्यान त्याने आपल्या मोबाईलमध्ये काही पुरावे डिलीट केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. यासोबतच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण येथील पोलिसांच्या संपर्कात देखील होता.
एकीकडे पोलिसांची काही पथके पीएसआय आरोपी गोपाळ बदने याचा शोध घेत होती तर तो काही पोलिसांच्याही संपर्कात होता. डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा अत्याचार आपण केला नसल्याचे पोलिस चाैकशीत पीएसआय बदनेने सांगितले. मात्र, डॉक्टर महिलेसोबत नेमके काय संबंध होते, यावर भाष्य करणे त्याने पूर्णपणे टाळले आहे. बीडपर्यंत पोहोचण्यात गोपाळ बदने याची मदत नेमकी कोणी केली, याचा शोध सध्या घेतला जातोय.