
साताऱ्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. संपदाने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. यासोबतच तिने मृत्यूपूर्वी तिची सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आता याप्रकरणी मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून मोठा विलंब आणि अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. या घटनेनंतर चार ते पाच तास उलटून गेले आहेत. तरी कोणतीही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच शवविच्छेदनाबद्दल पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा हालचाल दिसत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत डॉक्टरांनी केलेल्या एका कथित अर्जात एका खासदाराच्या पीएचा उल्लेख आहे. हा पीए फोनवरून बोलताना अनेकदा खासदार बोलत असल्याचे सांगायचा. तसेच रिपोर्ट बदलण्याबाबत दबाव टाकत असे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण राजकीय दबावाखाली असल्याचे आरोप कुटुंबाकडून केला जात आहे.
इथे काहीतरी नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. कारण तिथे आम्हाला एफआयआर दाखल करुन येण्यास ४ ते पाच तास लागले. आता या पोस्टमोर्टमसाठी तीन ते साडेतीन तास उलटून गेलेत तरी कोणी डॉक्टर पोस्टमोर्टमसाठी आलेले नाहीत. तिने आम्हाला जे काही अर्ज दिले होते. त्यात खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख आहे, असे तिच्या कुटुंबाने सांगितले.
खासदारांच्या पीएंच्या फोनवर फोन करुन खासदार बोलले आणि आमच्यावर चुकीचे रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला. त्यात खासदाराचे नाव नाही. पण पोलिसांची नावे आहेत, अशी प्रतिक्रिया महाडिक हे एसपी असावेत. त्यासोबतच गोपाल बदने, प्रशांत बनकर अशी नावे आहेत. यात निश्चित काही तरी असल्याने पोलिसांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पातळीवर गोंधळ होऊ नये म्हणून हे प्रकार केले जात आहेत असा माझा अंदाज आहे. जर असं होत असेल, तर आम्ही आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
दरम्यान या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे लागेबांधे, पोलीस अधिकाऱ्यांची कथित भूमिका आणि तपासात होणारा विलंब पाहता, प्रशासनावर तातडीने कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे. मृत डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.