बॉलिवूडचं प्रचंड वादग्रस्त गाणं, बंदी घातली तरीही 7 दिवसांमध्ये विकली 1 कोटी कॅसेट, आजही गाणं सुपरहिट
माधुरी दीक्षित-संजय दत्त यांचं 33 वर्षांपूर्वीचं प्रचंड वादग्रस्त गाणं, ज्याला दूरदर्शनवर घालण्यात आलेली बंदी. तरीही लोकांनी गाण्याला दिली पसंती. 7 दिवसांमध्ये विकली 1 कोटी कॅसेट.

1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' हा बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने कथा, अभिनय आणि संगीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली.

मात्र, या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. या गाण्याचे बोल वादग्रस्त असल्याच्या कारणावरून दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने त्याच्या प्रसारणावर बंदी घातली होती.

तरीही प्रेक्षकांमध्ये या गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट, चित्रपटाच्या संगीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या ऑडिओ कॅसेट्सच्या पहिल्याच आठवड्यात 1 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या.

'खलनायक'चे संगीत दिग्दर्शन लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी केले होते तर गीतकार आनंद बक्षी यांनी चित्रपटातील सर्व गाणी लिहिली होती. 'चोली के पीछे क्या है' व्यतिरिक्त 'नायक नहीं खलनायक हूं मैं', 'पालकी में होकर सवार चली रे' आणि 'आजा साजन आजा' ही गाणीही तुफान लोकप्रिय ठरली.

खलनायक'चा निर्मितीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च आला होता. चित्रपटाने 12.50 कोटी रुपयांचे नेट आणि 21.50 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. वादाच्या भोवऱ्यात सापडूनही 'खलनायक'ने संगीत आणि कमाईच्या जोरावर सुपरहिट चित्रपट म्हणून इतिहासात आपले स्थान कायम ठेवले.