
Satara Doctor Death Case : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सातारा डॉक्टर महिलेचे आत्महत्या प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थनी आहे. या प्रकरणाशी भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव जोडले जात आहे. सोबतच डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावाही केला जातोय. या सर्व प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरही टीका केली जात आहे. चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेच्या चारित्र्यांचे हनन केले आहे, असे म्हणत त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली जातेय. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. त्यामुळे आता चाकणकर यांचे महिला आयोगाचे अध्यक्षपद धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे.
साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पटलेली नाही. अजित पवार यांनी नुकतेच पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल आणि तुम्हाला न्याय दिला जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी मृत डॉक्टरच्या कुटंबीयांना दिले. यावेळी त्यांनी आम्ही रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या याच भूमिकेमुळे रुपाली चाकणकर यांचे अध्यक्षपद जाणार का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अजित पवार आणि मृत डॉक्टरच्या वडिलांचे फोनवरून बोलणे झाले. या संवादादरम्यान डॉक्टरच्या वडिलांनी आम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं बोलणं पटलेलं नाही, असे मनोगत व्यक्त केले. त्यावर बोलताना अजित पवार यांनी चाकणकर यांच्या मताशी आम्ही कोणीही सहमत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
तसेच मी यवतमाळ जिल्ह्यात आो आहे. रुपालीताई चाकणकर यांच्या भूमिकेबाबत मी पेपरमध्ये वाचलेलं आहे. त्या संदर्भात मी माझ्या पद्धतीने विचार करणार आहे. तुमच्या बोलण्यामागचा मतीतार्थ काय आहे? तुम्ही असं का बोललात? असं मी त्यांना विचारणार आहे, असंही अजित पवार यांनी या संभाषणादरम्यान स्पष्ट केलं. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना त्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेबाबत उत्तरं द्यावी लागणार आहेत. अजितदादांच्या या भूमिकेमुळे चाकणकर यांचे महिला आयोगाचे अध्यक्षपद जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.