महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता सुरेश धस यांची एण्ट्री; नेमकं काय घडलं?
साताऱ्यातील फलटण इथं महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने तिच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यात तिने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.

सातारा जिल्ह्यातील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तळहातावर सुसाईड नोट लिहून पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक छळाचा आरोप केला. ‘पीएसआय गोपाळ बदाणे यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला. पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी माझा मानसिक छळ केला’, असा मजकूर डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला आढळला. महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला एफआयआर दाखल करण्यासाठी चार ते पाच तास लागले, यात नक्कीच राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला. आता याप्रकरणी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले आमदार सुरेश धस?
“आई-वडिलांनी तीन एकर जमिनीवर लेकीला डॉक्टर बनवलं होतं. तिच्या तक्रारीची दखल न घेणारे जो कोणी अधिकारी असतील, त्या सर्वांना आरोप केलं पाहिजे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे. मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो. त्यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवलं पाहिजे. डॉक्टर तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या कुटुंबीयांच्या बाजूने उभे राहू,” असं ते म्हणाले.
हा खटला फास्टट्रॅक कोर्टात लढवला पाहिजे, अशीही मागणी धस यांनी केली. त्याचप्रमाणे एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. “पोटाला चिमटा घेऊन, ऊस तोडून आमची लोकं लेकीबाळीला शिकवतात. पण कोणी गैरफायदा घेत असेल तर जरब बसलीच पाहिजे. भविष्यात अशी दुसरी घटना घडता कामा नये. जर तिला कोणी बीडची म्हणून हिणवत असेल तर ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आमची बीडची लोकं बुद्धिमान आणि सर्व क्षेत्रात पुढे जाणारे आहेत,” असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
दरम्यान या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे लागेबांधे, पोलीस अधिकाऱ्यांची कथित भूमिका आणि तपासात होणारा विलंब पाहता, प्रशासनावर तातडीने कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे. बीडच्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
