शिंदे सेनेच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या… प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी संजय गायकवाड यांना मोठा झटका… न्यायालयाने थेट…
Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota Prashat Ambi: 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावण्यात आले होते. एक महिन्यापूर्वी काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या या पुस्तकावरून वाद रंगला. याप्रकरणात शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांना झटका बसला आहे.

MLA Sanjay Gaikwad And Publisher Prashat Ambi: ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी धमकावले होते. एक महिन्यापूर्वी या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला होता. आता प्रकरणात गायकवाड यांना मोठा झटका बसला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली आहे. तर प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्या देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण?
काँम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक लोकप्रिय आहे. या पुस्तकावरून याअगोदरही वाद पेटला होता. गेल्या महिन्यात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिली. याविषयीची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यानंतर प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या सर्व विषयात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली आहे. महाराजांचा खोटा इतिहास लिहितात. या पुस्तकात 300-400 वेळा त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. एकाठिकाणी या पुस्तकात औरंगजेबाला औरंगजेबजी म्हटले आहे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे असा आरोप गायकवाड यांनी केला होता. तर प्रशांत आंबी यांनी आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आंदोलन केले होते. याठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले होते. बुलढाण्यामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ
राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांची चौकशी व्हावी यासाठी प्रशांत आंबी यांनी कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीअंती गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी न्यायालयाने दिली. त्यामुळे याप्रकरणी पुढील कारवाईचा आणि गुन्हा नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजही धमकीसत्र
दरम्यान शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून आजही धमक्यांचे फोन सुरूच असल्याचे आंबी यांचे म्हणणे आहे. आपल्याला शंभरहून अधिक धमक्यांचे फोन आल्याचे आणि याविषयी पोलिसांकडे नव्याने तक्रार केल्याची माहिती आंबी यांनी दिली. यापूर्वी त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी मध्यरात्री अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या वादावर आता कधी पडदा पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.