गुजरातमध्ये मोदी मॅजिक कायम, पुन्हा एकदा होम ग्राऊंड मजबूत…

| Updated on: Dec 08, 2022 | 11:02 PM

गुजरातमध्ये काँग्रेस ताकदीनं लढली नाही. उलट आपनं ताकद दाखवल्यानं मतांमध्ये फूट पडून काँग्रेसला फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला झाला आहे.

गुजरातमध्ये मोदी मॅजिक कायम, पुन्हा एकदा होम ग्राऊंड मजबूत...
Follow us on

मुंबईः गुजरात निवडणुकीनंतर गुजरातमध्ये नेमकं काय होणार ?, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. पण भाजपनं फक्त सत्ताच राखली नाही, तर रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद केली आहे. गुजरातच्या इतिहासात आतापर्यंतच्या मोठ्या विजयाची नोंद मोदींच्या नेतृत्वाखाली झाली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं पुन्हा सत्ता आणली आहे. या मोठ्या विजयासह भाजपनं सलग सातव्यांदा, विजयाचा कीर्तीमान विजय स्थापित केला आहे.

गुजरातमध्ये भाजपचे 157 आमदार निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपच्या तब्बल 58 जागाही आता वाढल्या आहेत.

तर काँग्रेसला याठिकाणी जबर मार बसला आहे. काँग्रेसचे अवघे 16 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस 77 वरुन 19 वर आली म्हणजे, 61 जागा कमी झाल्या आहेत.

तर आम आदमी पार्टीचे 5 आमदार निवडून आलेत. गेल्या निवडणुकीपेक्षा आपचीही येथे चांगली कामगिरी झाली आहे. तर इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपनं सर्वेद्वारे पाहणी केली होती. त्यावेळी 84 जागाच जिंकू शकतो, असा भाजपला अंदाज आला होता. त्यामुळं रणनीतीपासून काही नेत्यांना दूरच ठेवून त्यांनी तशी पावलं टाकली होती. तर अमित शाहांना तिकीट वाटपाचे पूर्ण अधिकार देण्यात आले होते.

त्यामुळे शहांनीही मोठ्या खुबीनं तिकीट वाटप केलं होते. शहांनी तब्बल 38 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं होतं आणि इथं तरुणांना संधी देत अँटिइंक्बन्सीचाही परिणाम होऊ दिला नाही.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, नितीन पटेलांना माघार घेण्यास सांगण्यात आलं. सोशल इंजिनिअरिंग फक्त पाटीदारच नाही तर एससी, एसटींना समान तिकीट वाटप केलं गेलं.

विशेष म्हणजे ब्राह्मण समाजाचेही 13 उमेदवार दिले, आतापर्यंतची ही मोठी संख्या असल्याचे सांगण्यात येते. तसंच अहमदाबादमध्ये मुस्लिम महिलांनीही भाजपला मतं देऊन आश्चर्याचा धक्का दिला होता.

पहिल्या टप्प्यातील प्रचार सुरु होईपर्यंत भाजपला 125 जागांची आशा होती..पण प्रचारात मोदींनी एंट्री केली आणि सभा तसंच रोड शो मुळं वातावरण भाजपच्या बाजूनं झुकवलं गेले.

गुजरातमध्ये काँग्रेस ताकदीनं लढली नाही. उलट आपनं ताकद दाखवल्यानं मतांमध्ये फूट पडून काँग्रेसला फटका बसला आणि त्याचा फायदा भाजपला झाला आहे.

यावेळी गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मोदींनी गुजरातमध्ये धुवांधार प्रचार केला आणि गुजराती मतदारांनी मोदींवर विश्वास दाखवल्यानं भाजपनं ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

1985 मध्ये काँग्रेसनं माधवसिंह सोलंकींच्या नेतृत्वाखाली 149 जागा जिंकल्या होत्या. पण आता भाजपनं 150 जागा जिंकून गुजरातमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.

आणखी एका रेकॉर्डचा विचार केला तर, भाजपनं सलग 7 वेळा जिंकून लेफ्ट फ्रंटच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) 1977 ते 2011पर्यंत 7 वेळा म्हणजे 34 वर्षे सलग सत्तेत होती. आणि भाजपनंही 1995 पासून सलग 7 वेळा गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आहे.

गुजरातच्या निवडणुकीत, भाजप जेवढ्या ताकदीनं लढली तेवढी ताकद काँग्रेसनं ताकद लावली नाही. शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींच्या मोजक्याच सभा झाल्या होत्या. काँग्रेसनंही निवडणूक अधिक मनावर न घेतल्यानं त्याचा फटकाही काँग्रेसला बसला होता.

तब्बल 27 वर्षे सत्ता असतानाही भाजपवर अँटिइंक्बन्सीचा परिणाम झाला नाही गुजराती मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. मोदी मॅजिक कायम आहे, हेच गुजरातमध्ये पुन्हा एकदा दिसलं आहे. 2024 मध्ये मोदीच भाजपचा चेहरा आहेत, आणि होम ग्राऊंड मजबूत आहे हे मोदींनी मात्र आता दाखवून दिलं आहे.