उंदराने चावा घेतला, व्यक्तीचा मृत्यू, आता समिती करणार चौकशी

| Updated on: Apr 03, 2024 | 11:52 AM

sasoon hospital in pune: सागर दिलीप रेणुसे एका अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. या दोन्ही दाव्यांमध्ये आता ससून रुग्णालयाने घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उंदराने चावा घेतला, व्यक्तीचा मृत्यू, आता समिती करणार चौकशी
Follow us on

पुणे येथील ससून रुग्णालयाची चर्चा होत असते. कारागृहातील कैद्यांची बडदास्त ठेवली गेल्यामुळे ससून रुग्णालय काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. ड्रग्स माफिया आणि कैदी ललित पाटील याचे अनेक महिने उपचार या ठिकाणी झाले होते. त्यानंतर रुग्णालयातील लिफ्टमध्ये रुग्ण आणि कर्मचारी अडकल्याची चर्चा रंगली होती. आता एक उंदरामुळे ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. या रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा मृत्यू उंदराने चावा घेतल्यामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यावरुन गोंधळ झाला. आता या मृत्यू प्रकरणाची चौकशी समिती करणार आहे.

काय आहेत आरोप

ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये सागर दिलीप रेणुसे (वय ३०) दाखल होते. अतिदक्षता विभागात १ एप्रिलला सकाळी रुग्णाला उंदीर चावल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. त्याच रात्री रुग्णाचा मृत्यू झाला. एका उंदराने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रेणुसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या रुग्णाचा नातेवाईकांनी या प्रकरणावरुन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे पाऊल रुग्णालय प्रशासनाने उचलले आहे.

काय होता आजार

सागर दिलीप रेणुसे (वय ३०) हे एका अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. या दोन्ही दाव्यांमध्ये आता ससून रुग्णालयाने घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

सागर रेणुसे याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. दरम्यान या शवविच्छेदन अहवालात उंदीर चावल्याच्या जखमा आढळल्या नाही, असे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. विनायक काळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी म्हटले आहे.