शिवाजीराजे, शहाजीराजे यांच्या आधीचा ‘भोसले’ घराण्याचा काय आहे इतिहास?

Shivaji Maharaj : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे पूर्वज कोण होते? भोसले घराण्याचा उत्कर्ष कधी झाला? भोसले घराण्याचा सिसोदे या राजपूत वंशाशी आणि घोरपडे घराणे यांच्याशी संबध काय आहे? मेवाड ते रायगड असा भोसले घराण्याचा इतिहास यशोशिखरावर कसा पोहोचला... घ्या जाणून भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास...

शिवाजीराजे, शहाजीराजे यांच्या आधीचा 'भोसले' घराण्याचा काय आहे इतिहास?
Shivaji Maharaj, Shahajiraje Bhosle, malojiraje bhosle Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 11:29 PM

मुंबई : राजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे होती. चित्तोडच्या वंशांना रावळ तर सिसोदे यांच्या वंशजांना राणा अशा संज्ञा होत्या. या दोन्ही घराण्याचे मूळ मात्र अयोध्या प्रांतात सिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजघराणे होते. पुढे दिल्लीत यवनांचे राज्य आले. सत्तेच्या लालसेपोटी यवन बादशाह यांनी राजपूत राजांवर आक्रमणे केली. त्यांच्यात वारंवार युद्धे होत होती. अनेक हिंदुराजे त्यांचे अंकित झाले. पण, चितोडच्या शूर राजपुतांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. सन 1303 साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चित्तोडवर स्वारी केली. त्यावेळी चितोडवर रावळ रत्नसिंह याचे राज्य होते. रत्नसिंह याची पत्नी राणी पद्मिनी ही अति लावण्यवती होती. तिला प्राप्त करण्याच्या लालसेने खिलजी याने आक्रमण केले होते. खिलजी याच्या आक्रमणाला रावळ रत्नसिंह प्रतिकार करत होता. त्याच्या सोबतीला सिसोद्याचे राणा लक्ष्मणसिंह आपल्या सात मुलांसह मदतीसाठी धावून आला.

अल्लाउद्दीन खिलजी काही केल्या चितोडचा वेढा उठवीत नव्हता. त्याच्या प्रचंड सैन्याचा गराडा किल्ल्याभोवती पडला होता. राजा रावळ रत्नसिंह याने किल्ल्यातील राजपुतांसह शत्रु सैन्यावर एकदम हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सर्व शूर रजपुतांस मान्य झाला. राणा लक्ष्मणसिंह यानेही त्याला साथ दिली. त्या आत्मघातकी हल्ल्यात दोन्ही राजे मारले गेले. तर, राणी पद्मिनी हिने जोहर करून स्वतःचा अंत केला. मात्र, लढाईला सुरवात होण्यापूर्वी राणा लक्ष्मणसिंह याने आपला दुसरा मुलगा अजयसिंग याला आपल्या घराण्याचे निर्मूलन होणे इष्ट नाही. त्यामुळे अरवली पर्वतात कैलवाडा येथे जाऊन स्वप्राणाचे रक्षण करण्याचा सल्ला दिला. वडिलांचा हा सल्ला शूर अजयसिंग याला पसंद पडला नाही. परंतु, वडिलांनी खूपच आग्रह केल्यामुळे अखेर तो पत्नी आणि पुतण्यासह कैलवाडा येथे जाऊन राहिला.

महाराणा अजयसिंग याला राणा सुजनसिंह आणि राणा आरमसिंह ही दोन मुले होती. तर, त्याच्या पुतण्याचे नाव राणा ह्म्मीरसिंग असे होते. ह्म्मीरसिंग हा अजयसिंग याचा मोठा भाऊ अरिसिंग याचा मुलगा. अरीसिंग याने एका शेतकऱ्याच्या सुंदर अशा मुलीसोबत लग्न केले होते. त्यांच्या प्रेमसंबंधातून ह्म्मीरसिंग याचा जन्म झाळा होता. अजयसिंग याने कैलवाडा येथे राहून पुन्हा सैन्याची जमवाजमव करायला सुरवात केली. ह्म्मीरसिंग हा अतिशय शूर आणि पराक्रमी होता. अजयसिंग याचे त्याच्यावर खूप प्रेम होते. चितोडमध्ये झालेला पराभव अजयसिंग याचा जिव्हारी लागला होता. चितोड येथील नौबत, राज- चिन्हे शत्रूच्या हाती गेली होती. ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या किल्ल्याची पायरी चढणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्याने केली होती. ज्या शत्रूमुळे घराण्याचा भयंकर संहार झाला त्यांचा पुरता पराभव करून सूड उगवत नाही तोपर्यंत आपली निशाणे मागे चालवावी असा नियम त्याने घालून घेतला होता. ताटात भोजन न करण्याचा, पलंगावर झोप न घेण्याचा नियमही त्याने स्वतःवर लादून घेतला होता. हा यवनद्वेष सिसोदे राजवंशाने पुढे असाच चालविला. अजयसिंग यांनी जागोजागी आपली ठाणी बसविली. नवीन किल्ले बांधले. स्वसत्ता वृद्धि केली आणि उदेपूर येथील राजनगर किल्ल्यावर आपली गादी स्थापली.

राणा अजयसिंह यांनी मुलगा राणा सुजनसिंह याच्यावर राज्याला त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपविली होती. पण, तो ही कामगिरी पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे अजयसिंह यांनी ही कामगिरी ह्म्मीरसिंग याच्यावर सोपविली. ह्म्मीरने राज्यास त्रास देणाऱ्याचे शीर कापून आणले. त्याच्या कामगिरीवर खुष होऊन अजयसिंहाने त्याला आपला वारस नेमले. तसेच, उदेपूरच्या गादीवर ह्म्मीरसिंग याला बसवून अजयसिंग कारभार पाहू लागला.

राणा सुजनसिंह आणि राणा आरमसिंह यांना वडिलांचा निर्णय आवडला नाही. याच दरम्यान अजयसिह मरण पावला. पण, चुलतभाऊ ह्म्मीरसिंग याच्याशी कलह टाळत सजनसिंग 1334 च्या सुमारास दक्षिणेत आला. दक्षिणेत आल्यावर त्यांनी बहामनी घराण्याचा मुळ पुरुष हसनगंगू याच्या पदरी चाकरी पत्करली. 1346 साली बादशहा महमंद तुघलक याने हसनगंगूचा पाडाव करण्यासाठी दक्षिणेत स्वारी केली. या लढाईत सुजनसिंग यांनी मोठा पराक्रम गाजविला. 1347 ला हसनगंगू याने अल्लाउद्दीन बहमन नाव धारण करत गुलबर्गा येथे बहामनी राज्याची स्थापना केली. त्याने सुजनसिंग याच्या कामगिरीची दखल घेत देवगिरी प्रांतातील 10 गावे जहागीर देऊन मोठी सरदारी दिली. 1355 मध्ये सुजनसिंह मरण पावला आणि त्याचा पुत्र दिलीपसिंग कुटूंबप्रमुख झाला. दिलीपसिंह याचा मुलगा सिद्दजी मोठा कर्तबगार होता. त्याने बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ प्राण खर्ची घातले. त्याचा पुत्र भैरवसिंह उर्फ भोसाजी याच्या पिढीपासून या घराण्यात भोसले हे उपनाव रुढ झाले. भोसाजी याचा मुलगा देवराज महाराणा हा यवनांच्या त्रासाने जेरीस आला होता. त्याने स्वराज्याचा त्याग केला आणि तो कृष्णा, भीमा नदीतीरी पाळेगारी करून राहू लागला.

घोरपडे घराण्याचा मूळ पुरुष कर्णसिंग…

देवराज महाराणा याचा मुलगा इंद्रसेन याने मात्र पुन्हा स्वराज्याच्या ध्यास घेतला. त्याने खानवट, हिगणी, बेरडी, देऊळगाव, जिती, वेरूळ, बनसेंद्र, कळसवावी, मुंगीपैठण, नानजव इत्यादि गावाच्या पाटीलक्या खरेदी केल्या. इंद्रसेन याला कर्णसिंग आणि शुभकृष्ण ही दोन मुले होती. त्यातील मोठा मुलगा कर्णसिंग याने बहामनी साम्राज्यात चाकरी स्वीकारली. बहामनी वजीर महमद गवान याने दक्षिण कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहिम हाती घेतली.

गवानसोबत त्या मोहिमेत कर्णसिंग आपला मुलगा भीमसिंग याच्यासह सहभागी झाला होता. ( इ.स. 1469) या मोहिमेत खेळणा किल्ला घेण्यासाठी बहामनी फौजा प्रयत्न करत होत्या. मात्र, कर्णसिंग आणि भीमसिंग पितापुत्रांनी किल्ल्यावर चढण्यासाठी घोरपडीचा वापर करून खेळणा चढून गेले. किल्ल्यावर घणाघाती लढाई झाली. या लढाईत कर्णसिंह धारातीर्थी पडला. पण, त्याच्या प्रयत्नाने दक्षिण कोकणाचे प्रवेशद्वार खेळणा किल्ला जिंकला गेला. बहामनी सुलतानाने भीमसिंह यांचा गौरव केला. भीमसिंह याला ‘राजा घोरपडे बहाद्दर’ हा किताब दिला. तसेच, कर्नाटकातील मुधोळ आणि त्याजवळची 84 गावे जहागीर म्हणून दिली. तेव्हापासून कर्णसिंग याचे घराणे घोरपडे या आडनावाने ओळखले जाऊ लागले.

भोसले घराण्याचा मूळ पुरुष शुभकृष्णसिंग…

कर्णसिंग याने बहामनी साम्राज्यात चाकरी पत्करून ‘राजे घोरपडे बहाद्दर’ हा किताब मिळविला. तर, कर्णसिंग याचा लहान भाऊ शुभकृष्णसिंग याने वेरूळ भागात आपली वस्ती निर्माण केली. इंद्रसेन स्वतःला भोसावंत म्हणत होता. तेच नाव शुभकृष्णसिंग याने कायम ठेवले. हेच नाव पुढे भोसले असे रूढ झाले. शुभकृष्णसिंग यांच्या नंतर रूपसिंह, भूमिंद, धापजी, बरहटं, खेलोजी ऊर्फ खलकर्ण, कर्णसिंग ऊर्फ जयकर्ण, संभाजी आणि बाबाजी ऊर्फ शिवाजी असे वंशज झाले.

पराक्रमी मालोजी भोसले यांचा जन्म

बाबाजी भोसले यांचा जन्म सन 1533 मध्ये झाला. निजामशाही राजवटीमध्ये वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे महत्त्व विशेष वाढले. बाबाजी भोसले यांनी निजामशाहीमध्ये कर्तबगारी दाखविली. शाही सुलतानाने या कर्तबगारीबद्दल त्यांना नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव गावची जहागीर दिली. हे गाव आदिलशाही आणि निजामशाही यांच्या सरहद्दीवर होते. त्यामुळे या गावची जहागिरी सांभाळणे हे काम तसे जोखमीचेच होते. पण, बाबाजी याच्याजवळ ती कुवत असल्यामुळेच निजामशहाने त्यांना ही जहागिरी दिली होती. बाबाजी हे पाच गावांचे मुकादम आणि दोन गावांचे देशमुख झाले. त्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारत होती.

बाबाजी मोठे सदाचारी आणि धर्मशील होते. त्याला मालोजी आणि विठोजी असे दोन पुत्र होते. मालोजीचा जन्म 1550 साली झाला तर विठोजी याचा जन्म 1553 मध्ये झाला. हे दोघेही मोठे हुशार आणि सद्गुणी होते. मालोजीराजे भोसले आणि देऊळगांवचे शेतकरी यांच्यात जमिनी संबंधाने तंटे उपस्थित झाले. त्यांचे पटेनासे झाले. त्यामुळे ते दौलताबादे जवळील वेरूळ गावी येथे येऊन राहिले. आपल्या अंगातील धमक आणि हुशारी याचे योग्य चीज होईल असा काही तरी व्यवसाय पाहावा असे त्यांचा मनात येऊन त्यांनी सिंदखेडच्या लुखजी जाधवराव यांच्या पदरी पायबारगिरीची नोकरी धरली. जाधवराव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. सिदखेडची देशमुखी त्यांच्याकडे होती. अहमदनगरच्या निजामशाहीत त्यांना बारा हजार स्वाराची मनसब मिळाली होती. या फौजेच्या खर्चासाठी त्याला सरकारातून जहागीर मिळाली होती. त्याच्यासारखे बलाढ्य आणि शूर सरदार त्यावेळी निजामशाहीत थोडे होते. लखुजी जाधवराव यांनी मालोजी आणि विठोजी यांना मोठ्या आनंदाने आश्रय दिला. त्यांनी प्रत्येकास पाच होन पगार देऊ केला.

मालोजी शरीराने मोठा मजबूत आणि धिप्पाड होता. त्याच्या स्वारीस घोडे टिकत नसत. मालोजी मोठा चतुर, हुशार आणि गुणी होता. त्यामुळे जाधवरावाचा लवकरच त्याच्यावर लोभ जडला. त्यांनी मूर्तिजा निजामशहापाशी मालोजीला नेले. त्याची मोठी शिफारस केली. निजामशहाने मालोजीची इभ्रत आणि हुशारी पाहून खुष होऊन आपल्या लष्करात शिलेदारी दिली. इ. स. 1588-89 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईमध्ये मालोजी आणि विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला. त्यामुळे निजामशहा याने खुश होऊन दोन्ही भावांना दीड हजारांचा सरंजाम देऊन बढती दिली. यामध्ये शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा त्यांच्या वहिवाटीस आला. त्यावेळी मालोजी याचे वय केवळ पंधरा वर्ष इतके होते. 1591 ते 1595 काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात संघर्ष सुरु होता. मालोजीराजे यांनी या संघर्षात निजामशहाच्यावतीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्यामुळे निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला.

मालोजीराजे यांचा नवस आणि शहाजीराजे यांचा जन्म

मालोजीराजे यांना बढती मिळाली. मानमनतराब मिळू लागला. फलटणचा देशमुख जगपाळराव निबाळकर यांनी मालोजीराजे यांची हुशारी पाहून आपली बहिण दिपाबाई यांच्याशी विवाह लावून दिला. भाऊ विठोजी यालाही शिलेदारी मिळाली होती. विठोजी याचे लग्न होऊन आठ मुले झाली तरी मालोजी यांना संतती होईना. आपल्या पोटी मूल नाही याचे दिपाबाई यांना अतिशय वाईट वाटत होते. मालोजीराजे आणि दीपाबाई यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुष्कळ दानधर्म, अनुष्टान केले. नवस केले. मालोजीराजे यांनी नगरचा पीर शहाशरीफ यास नवस केला. प्रत्येक गुरुवारी फकिरास दानधर्म आणि खैरात करत असे. सतत सहा महिने हा क्रम त्यांनी सुरु ठेवला. अखेर, या नवसाचे फळ म्हणून दिपाबाई गरोदर राहिल्या. त्यांना प्रथम पुत्ररत्न झाले. हा पुत्र पिर शहाशरीफच्या अनुग्रहाने प्राप्त झाला असे मानून मालोजी यांनी त्याचे नाव ठेवले शहाजी. काही काळाने त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी शरीफजी असे ठेवले.

मालोजीराजे यांनी मेवाडच्या भवानीप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला आपली कुलदेवता मानले. शिखर शिंगणापूर आणि तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलस्थाने बनली. वेरूळ येथे रहात असताना मालोजीराजे यांनी वतनदारीत वाढ केली. वतने आणि पाटीलकी मिळाल्याने त्यांचा साम्राज्य विस्तार वेरूळपासून पुण्यापर्यंत पसरला होता. निजामशहा याच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. त्यांच्यात चकमकी होऊ लागल्या. मालोजीराजे यांनी मलिक अंबरचा पक्ष घेतला. मिआन राजू याच्या सैन्याने इंदापूर परगण्यातील गढीमध्ये वास्तव्य असलेली मालोजीराजे यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी झालेल्या चकमकीत मालोजीराजे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी शहाजीराजे हे केवळ सहा वर्षाचे होते. मालोजी यांच्या त्यांचा भाऊ विठोजी याने 1611 पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीराजे यांच्याकडे आली.

कीर्तिवंत शहाजीराजे भोसले…

मालोजीराजे आणि दीपाबाई याच्या पोटी जन्मलेले शहाजी लहानपणापासूनच देखणा, मोठा चलाख, हुशार आणि गुणी होता. त्याची वाणी अत्यंत मधुर होती. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्याचे पितृछत्र हरपले. पण, चुलते विठोजी यांनी त्याला लष्करी शिक्षण देऊन त्याचे पालनपोषण केले. लघुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई हिच्याशी त्यांचे लग्न झाले. शहाजी आणि जिजाबाई यांना सहा मुली आणि दोन मुलगे अशी एकूण आठ अपत्ये झाली. जसे जसे शहाजीराजे मोठे होत होते तस तसा त्यांचा पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी याबाबतीत कीर्ती सर्वदूर वाढत गेली.

1638 मध्ये शहाजीराजे भोसले यांनी आदिलशाही सरदार रानादुल्ला खान याच्यासोबत बेंगलोरवर चालून गेले. त्यांनी कर्नाटकमधील राजांना पराभूत केले. या पराक्रमाबद्दल आदिलशहा याने शहाजी यांना बेंगलोरची जहागिर बहाल केली. तसेच, त्यांनी काबीज केलेला पुणे परगणाही त्यांच्याकडे कायम ठेवला. शहाजीराजे यांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. त्यामुळे त्यांनी थोरला मुलगा याला घेऊन तेथेच आपले वास्तव्य केले. शहाजीराजे आणि संभाजी यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे येथेच ठरविले. त्यांनी ज्या राजांचा पराभव केला त्यांना शिक्षा किंवा देहदंड न करता मांडलिक केले. त्यामुळे जेव्हा शहाजी राजे सैन्याची गरज पडायची तेव्हा ते राजे शहाजी यांच्या मदतीला धावत.

थोरला मुलगा संभाजी याची जबाबदारी शहाजीराजे तर शिवाजीराजे यांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईं यांनी घेतली होती. 1637 मध्ये शहाजी पत्नी जिजाई आणि शिवाजीसह विजापुरला गेले. तेथे त्यांनी स्वराज्याचा मनोदय सांगितला. संभाजी यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे तर शिवाजीने महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे ही त्यांची इच्छा होती. 1640 मध्ये शिवाजी, जिजाबाई यांना शहाजीराजे यांनी बंगलोरला आणले. बंगळूरवरुन परत येताच शिवाजी यांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने हालचाली करण्यास सुरवात केली. शिवरायांचे भोसले घराणे हे पूर्वीपासूनच वतनदार आणि नावारूपाला आलेले घराणे होते हे स्पष्ट आहे. सिसोदे वंशातील राणा घराण्याच्या घोरपडे आणि भोसले अशा दोन शाखा तयार झाल्या. परंतु, त्या दोघांचे मूळ एकच आहे. त्यामुळेच मेवाड ते रायगड असा भोसले घराण्याचा इतिहास यशोशिखरावर पोहोचला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.