आता मराठा तरुणांचीच मेगाभरतीविरोधात याचिका!

  • Sachin Patil
  • Published On - 12:18 PM, 18 Dec 2018

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका प्रलंबित असताना, आता मेगाभरतीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचिकाकर्त्यांमध्ये मराठी तरुणांचाही समावेश आहे. मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानंतर, मेगाभरतीविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात मराठा समाजातील तरुणांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने नुकतंच परिपत्रक काढून मेगा भरती करण्याची घोषणा केली आहे. 70 हजार पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही भरती कंत्राटी पद्धतीने आणि बाहेरच्या एजन्सी मार्फत केली जाणार असल्याची माहिती आहे.

याविरोधात राज्यातील कंत्राटी कर्मचारी सक्रिय झाले आहेत. आधीच राज्यात सुमारे दीड लाख कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यात मराठा समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आधी सेवेत घ्या, असं या मराठा कंत्राटी तरुणांचं म्हणणं आहे.

“आम्ही गेल्या 5 ते 10 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. त्यातच आता सरकार नव्याने भरती करणार आहेत. ही भरती बाहेरील संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. मात्र आम्ही पूर्वीपासून काम करत असताना आमच्याबाबत सरकारचा निर्णय काय आहे? आम्हाला सरकारने आधी सेवेत घ्यावं” असं या कंत्राटी तरुणांचं म्हणणं आहे.

याबाबतच या तरुणांनी मुंबई हायकोर्टात काल याचिका दाखल केली. ती याचिका कोर्टाने आज स्वीकारली आहे.

यापूर्वी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. पण मराठा आरक्षणानंतर राज्याचे एकूण आरक्षण हे 68 टक्क्यांवर गेले आहे. याच संदर्भात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी  3 डिसेंबर रोजी याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधानाच्या तरतुदींविरोधात असल्याचं सांगत, अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली आहे.

29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले. या विधेयकाला सर्व विरोधकांनीही पूर्ण पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाचं विधेयक विधानसभा आणि विधान परिषद अशा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं. त्यानंतर राज्यपालांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झालं. 1 डिसेंबरपासून हे आरक्षण मराठ्यांना लागू झालं.

मेगाभरती

तब्बल आठ वर्षानंतर राज्य सरकारने नोकरभरतीची घोषणा केली. ज्यात यंदा 36 हजार आणि पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरली जातील. शिक्षण सेवकांच्या धरतीवर पहिली पाच वर्ष मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर कामगिरी आणि पात्रता बघून नोकरीत कायम केलं जाणार आहे. पण ही भरती स्थगित करण्यात आली होती.

कोणत्या खात्यात किती जागा
राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य खात्यात 10 हजार 568 पदं, गृह खात्यात 7 हजार 111, ग्रामविकास खात्यात 11 हजार, कृषी खात्यात 2500, सार्वजनिक बांधकाम खात्यात 8 हजार 337, नगरविकास खात्यात 1500, जलसंपदा खात्यात 8227, जलसंधारण खात्यात 2 हजार 423, पशुसंवर्धन खात्यात 1 हजार 47 आणि मत्स्य खात्यात 90 पदं भरली जाणार आहेत.

संबंधित बातम्या 

अखेर प्रतीक्षा संपली, पुढच्या आठवड्यात मेगाभरतीची जाहिरात

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही : हायकोर्ट 

शिक्षक भरतीचा मुहूर्त ठरला, जानेवारीपासून भरती सुरु  

गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील कोण?  

दादा म्हणाले, 50 टक्के केस संपली, मराठा आरक्षणाचं गुपित फोडलं!