
पालक म्हणून आपण मुलांना उत्तम शिक्षण द्यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजच्या महागाईच्या युगात हे स्वप्न सहजपणे पूर्ण करणं शक्य होत नाही. कारण उच्च शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस गगनाला भिडतोय. यावर एकच उपाय आहे – योग्य वेळेस गुंतवणुकीची सुरुवात. बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय आहेत. पण आज आपण अशा दोन योजना पाहणार आहोत. ज्या मुलांच्या शिक्षणासाठी मजबूत आर्थिक आधार देऊ शकतात. म्युच्युअल फंडमधील SIP आणि सुकन्या समृद्धी योजना. चला पाहूया, या दोन्हीमध्ये नेमकं काय विशेष आहे.
Systematic Investment Plan म्हणजेच SIP ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे. यात दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप वळती जाते.
उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला 2000 रुपयात SIP मध्ये गुंतवता, तर एका वर्षात ₹24,000 आणि 20 वर्षांत ₹4.80 लाख इतकी गुंतवणूक करता येईल. यात सरासरी 12% वार्षिक परतावा गृहित धरला, तर 20 वर्षांनंतर तुमच्याकडे ₹18.40 लाखांचा फंड तयार होऊ शकतो – जो तुमच्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी मोठा हातभार लावेल.
जर तुमची मुलगी असेल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सुरक्षित आणि सरकारमान्य पर्याय आहे. या योजनेत सध्या 8.1% वार्षिक व्याज दिलं जातं. सरकार या व्याजदरात वेळोवेळी बदल करत असते, पण रक्कम सुरक्षित असते.
या योजनेतही जर तुम्ही दर महिन्याला ₹2000 गुंतवणूक केली, तर 20 वर्षांत ₹4.80 लाख इतकी एकूण गुंतवणूक होईल. आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजासह 20 वर्षांनी तुमच्याकडे ₹11.59 लाखांचा फंड तयार होईल.
SIP मध्ये बाजाराचा थोडासा धोका असला तरी दीर्घकाळात मिळणारा परतावा खूपच आकर्षक आहे. दुसरीकडे, सुकन्या योजना स्थिर आणि सुरक्षित असली तरी तिचा परतावा SIP इतका जास्त नाही. शेवटी, निर्णय तुमचाच – पण जर तुम्ही आजपासूनच नियोजन सुरू केलं, तर उद्या तुमच्या मुलाचं शिक्षण कुठेही अडणार नाही.