
सध्याच्या महागाईच्या युगात घर घेणं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं आर्थिक पाऊल. अशा वेळी जर तुम्ही काही शासकीय सवलतींचा योग्य वापर केला, तर घर खरेदी करताना लाखो रुपये वाचवता येतात. यातीलच एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे घराची नोंदणी थेट पत्नीच्या किंवा कोणत्याही महिलाच्या नावावर करणं.
महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्य सरकारांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सहभागात वाढ करण्यासाठी घर खरेदीवर स्टॅम्प ड्युटीमध्ये विशेष सवलत दिली आहे. विशेषतः महाराष्ट्रात महिला खरेदीदारांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये 1 टक्का सूट दिली जाते. हे प्रमाण थोडं वाटत असलं, तरी कोट्यवधींच्या व्यवहारात यामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
घर खरेदी करताना विक्री किमतीच्या एक ठराविक टक्केवारीनुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. महाराष्ट्रात पुरुषांसाठी ही दर सामान्यतः 6 टक्क्यांपर्यंत असते. मात्र, जर घराची नोंदणी महिलांच्या नावावर झाली, तर त्यांच्यासाठी ही दर फक्त 5 टक्के ठेवण्यात आली आहे.
उदाहरणार्थ, जर एखादं घर 50 लाख रुपयांचं असेल, तर पुरुष खरेदीदाराला 3 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल (6%). परंतु जर तेच घर महिलेच्या नावावर घेतलं, तर ड्युटी फक्त 2.5 लाख रुपये (5%) लागते. म्हणजेच तुमच्या खिशातून थेट 50,000 रुपयांची बचत!
घराची रजिस्ट्रेशन संपूर्णपणे स्त्रीच्या नावावर व्हावं लागतं.
काही राज्यांमध्ये संयुक्त मालकी हक्क असतानाही अंशतः सवलत मिळते.
जर महिला नावावर घर घेतल्यानंतर काही वर्षात ते दुसऱ्याच्या नावावर केलं, तर सवलत रद्द होऊ शकते.
याशिवाय मिळणारे इतर फायदे
अनेक बँका महिला गृहखरेदीदारांसाठी कमी व्याजदराने गृहकर्ज देतात.
घरावर महिला नाव असल्यास पुढील काळात उत्पन्नाच्या आधारावर टॅक्समध्ये सवलत घेण्यासही मदत होते.
महिला सबलीकरणाला चालना मिळते आणि घरावर त्यांचा हक्क वाढतो.
घर खरेदी करताना रजिस्ट्रेशनसाठी जाण्यापूर्वीच निर्णय घ्या की, मालकी हक्क कोणाच्या नावावर हवा. दस्त नोंदणी दरम्यान महिला खरेदीदार असल्याचे नमूद करा आणि संबंधित कागदपत्रांसह सवलतीसाठी अर्ज करा.