
भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तुळस ही हिंदू धर्मामध्ये आस्था, अध्यात्म आणि पवित्रतेचं प्रतिक आहे. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहाते असं मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात तुळस लावण्याची प्रथा आहे. मात्र फार थोड्या लोकांना माहीत आहे की, तुळशीचे देखील दोन प्रकार आहेत. राम तुळस आणि कृष्ण तुळस, असे तुळशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत. दोन्हीचा रंग, नैसर्गिक आणि धार्मिक महत्त्व वेगवेगळं आहे, आज आपण यातील फरक जाणून घेणार आहोत.
राम तुळस
राम तुळशीचा रंग हा हिरवा असतो, अनेक घरांमध्ये राम तुळसच लावली जाते. ही तुळस भगवान श्री राम यांना समर्पित आहे. ही तुळस संयम आणि विनम्रता यांचं प्रतिक आहे. ही तुळस घरामध्ये लावल्यानंतर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. मानसिक शांती मिळते. पुजापाठ करताना देवांच्या मूर्तीवर अर्पण करण्यासाठी या तुळशीच्या पानांचा वापर करतात. प्रसादामध्ये देखील या तुळशीच्या पानाला मोठं महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार ही तुळस खोकला, सर्दी, ताप या सारख्या आजारांमध्ये देखील गुणकारी आहे.
कृष्ण तुळस
कृष्ण तुळस ही भगवान कृष्ण यांना समर्पित आहे. या तुळशीच्या पानांचा रंग हा थोडासा हिरवा काळसर असतो. या तुळशीचे पानं जांभळ्या कलरचे वाटतात. धार्मिक मान्यतानुसार ही तुळस भक्ती भावाचं प्रतिक मानली जाते, घरातील सर्व नकारात्मक ऊर्ज दूर करण्याची शक्ती या तुळशीमध्ये असते, आयुर्वेदानुसार या तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
घरात कोणती तुळस लावावी?
घरामध्ये राम तुळसच लावली जाते, काही घरांमध्ये कृष्ण तुळस देखील लावली जाते. मात्र कृष्ण तुळस ही शक्यतो जंगलामध्ये आढळते तर राम तुळस घरांमध्ये लावली जाते. दोन्ही तुळशीचे गुणधर्म हे काहीप्रमाणात जरी वेगवेगळे असले तरी देखील दोन्ही तुळशी या श्रद्धा आणि अस्थेचं प्रतिक आहेत.