T20 World Cup संघातून डावललं आणि वडिलांचं छत्र हरपलं, भारतीय क्रिकेटपटूच्या वेदना आल्या बाहेर

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर भारतीय खेळाडूने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. एक तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याचं दु:ख होतं. त्यानंतर वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.

T20 World Cup संघातून डावललं आणि वडिलांचं छत्र हरपलं, भारतीय क्रिकेटपटूच्या वेदना आल्या बाहेर
T20 World Cup संघातून डावललं आणि वडिलांचं छत्र हरपलं, भारतीय क्रिकेटपटूच्या वेदना आल्या बाहेर
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 12, 2026 | 3:47 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट गोड झाला आहे. भारताने जेतेपदावर नाव कोरलं आणि विक्रमही रचले. आता स्पर्धा संपली असून चर्चांचा बाजारही थंडावत चालला आहे. असं असताना एका खेळाडूने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जितेश शर्मा आहे. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची घोषणा होईपर्यंत जितेश शर्माचं नाव चर्चेत होतं. कारण टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर जितेश शर्मा टी20 संघांचा भाग होता. पण शेवटच्या टप्प्यात निवडकर्त्यांनी दोन वर्षापासून टीम इंडियाबाहेर असलेल्या इशान किशनवर विश्वास टाकला आणि त्याची संघात निवड केली. इशान किशन गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत होता. तसेच त्याने आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर संघात जागा मिळवली. त्याचा फॉर्म पाहता त्याला डावलणं टीम इंडियाला परवडणारं नव्हतं. त्याने तशीच कामगिरी करत निवड योग्य असल्याचं दाखवूनही दिलं.

जितेश शर्मावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात जितेश शर्माचं नाव नव्हतं. त्यामुळे जितेश शर्मा नाराज होता. अशा स्थितीत त्याच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे दुहेरी धक्का बसला. जितेश शर्माच्या वडिलांचं 1 फेब्रुवारीला निधन झालं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच जितेश शर्मा दु:खाच्या डोंगराखाली दाबला गेला. जितेश शर्माच्या मते, टी20 वर्ल्डकप संघातून डावलल्यानंतर मन उदास झालं होतं. तेव्हा कुटुंबिय आणि मित्रांनी साथ दिली. त्यामुळे या दु:खाच्या प्रसंगातून बाहेर निघण्यास मदत झाली. पण त्यातून बाहेर निघत तोच वडिलांचं निधन झालं .

जितेश शर्माने सांगितलं की, सात दिवस मी माझ्या वडिलांसोबत होतो. तेव्हा लक्षात वडिलांना माझी सर्वात जास्त गरज होती. यासाठी देवाचे आभार मानले की, वडिलांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबत होतो. तसेच त्यांची काळजी घेऊ शकलो. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांची जबाबदारी आता जितेश शर्माच्या खांद्यावर पडली आहे. त्याला आई, भाऊ आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, जितेश शर्मा आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे.

Follow Us