मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा

मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा

| Updated on: Jun 20, 2026 | 10:21 AM

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून “ऑपरेशन टायगर” संदर्भातील पहिला फोटो समोर आल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोमध्ये बंडखोर खासदार दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या “ऑपरेशन टायगर” संदर्भात आता एक महत्त्वाचा फोटो समोर आला आहे. बंडखोर खासदारांचा हा पहिलाच फोटो असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर हे बंडखोर खासदार शिंदे गटाच्या कार्यक्रमात दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे न होता आता त्यांच्या उपस्थितीचा पहिला फोटो tv9marathi वर समोर आला आहे. आतापर्यंत या खासदारांचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सार्वजनिकरित्या समोर आले नव्हते.

समोर आलेल्या फोटोमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हे तिन्ही खासदार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचे फोटोवरून दिसत असले, तरी ते नेमके कोणत्या ठिकाणी थांबले आहेत याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार “ऑपरेशन टायगर” ही मोहीम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेत शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अभिषेक वर्मा यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.

फोटोमध्ये खासदारांसोबत दिसणारी चौथी व्यक्ती डॉ. अभिषेक वर्मा असल्याचा दावा केला जात असून, ते देखील या मोहिमेचा भाग होते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

या फोटोमुळे बंडखोर खासदारांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतची उत्सुकता आणखी वाढली असून, आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 20, 2026 10:05 AM
Follow Us