अख्खं प्रायव्हेट जेट येईल एवढं महागडं घर, 274 कोटीत खरेदी; देशातील या महागड्या घराची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा

Luxury Home : गेल्या काही काळापासून देशातील बडे उद्योगपती, उद्योजक आणि नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आलिशान घरांसाठी 100 कोटी ते 600 कोटी रुपये मोजत असल्याचे समोर आले आहे.

अख्खं प्रायव्हेट जेट येईल एवढं महागडं घर, 274 कोटीत खरेदी; देशातील या महागड्या घराची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा
Luxery Home
Image Credit source: Google
| Updated on: Aug 10, 2026 | 9:31 PM

हक्काचं घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. एका बाजूला भारतातील मोठा वर्ग आपल्या आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून स्वस्त आणि परवडणारे घर शोधत असतो. तर दुसऱ्या बाजूला असा एक वर्ग आहे, जो स्वतःच्या राहण्यासाठी अशा घरांची खरेदी करत आहे, ज्यांची किंमत एखाद्या खासगी जेटपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. 2025 नंतर देशातील अल्ट्रा-रिच म्हणजेच अतिशय श्रीमंत लोकांमध्ये महागडी घरे खरेदी करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. बडे उद्योगपती, उद्योजक आणि नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी अशा घरांसाठी 100 कोटी ते 600 कोटी रुपये सहज मोजतात.

लग्झरी घरांची बदलती व्याख्या

संपूर्ण भारतात सध्या उद्योजक मानव सरदाना यांची चर्चा होत आहे. त्यांनी अलिकडेच तब्बल 271 कोटींना एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे. तुम्हाला वाटलं असेल की हे घर समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईत असेल, पण हे घर दिल्लीजवळील गुरुग्राममधील गगनचुंबी इमारतीमध्ये आहे. त्यांचे हे पेंटहाऊस गुरुग्राममधील अत्यंत पॉश ‘डीएलएफ द डहेलियास’ प्रकल्पात आहे. याच प्रकल्पात दिग्गज गुंतवणूकदार मधुसूदन केला यांनीही सुमारे 121 कोटी रुपयांना आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्यांच्याशिवाय बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष अजीत जैन यांनीही ‘डीएलएफ द डहेलियास’मध्ये 85 कोटी रुपयांचे घर घेतले आहे.

2025 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत गुरुग्रामने मुंबईलाही मागे टाकले होते. 2025 मध्ये गुरुग्राममध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची 1,494 घरे विकली गेली, ज्यांची एकूण किंमत 24,120 कोटी रुपये होती. 2023 मध्ये हा आकडा 4,004 कोटी रुपये होता, म्हणजेच सुमारे सहा पट वाढ झाली आहे. एवढेच नाही, तर दिल्लीतील लुटियन्स परिसरातही भाड्याच्या घरांची मागणी इतकी वाढली आहे की, तेथील बंगल्यांचे भाडे दरमहा 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

मुंबईचे वर्चस्व कायम

लग्झरी घरांच्या बाबतीत गुरुग्राम वेगाने पुढे जात असले, तरी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुपर-लग्झरी घरांचा विचार केला तर मुंबई आजही अव्वल स्थानावर आहे. केवळ वरळी परिसराचा विचार केला, तर गेल्या 24 महिन्यांत 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची 30 हून अधिक घरे विकली गेली आहेत. या व्यवहारांची एकूण किंमत 5,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

20 कोटी ते 50 कोटी रुपयांच्या घरांची बंपर विक्री

एका अहवालानुसार, देशातील मोठ्या शहरांमध्ये 20 कोटी ते 50 कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 2026 च्या पहिल्या सहामाहीत (H1) या श्रेणीतील 371 घरे विकली गेली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या 181 घरांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहेत. या श्रेणीत वार्षिक 105 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या 371 घरांपैकी तब्बल 214 घरे एकट्या मुंबईत विकली गेली, म्हणजेच एकूण विक्रीपैकी 57 टक्के वाटा मुंबईचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us